हॉटेलचालकाला मारहाण करून लुटणाऱ्या कुख्यात अनिस बोक्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:05 AM2021-06-25T04:05:02+5:302021-06-25T04:05:02+5:30
औरंगाबाद : नऊ महिने जेलमध्ये राहिल्यानंतर आठ दिवसांपूर्वी बाहेर आलेल्या कुख्यात मोहम्मद अनिस माेहम्मद हनीफ उर्फ ‘बोक्या’ याने हॉटेलचालक ...
औरंगाबाद : नऊ महिने जेलमध्ये राहिल्यानंतर आठ दिवसांपूर्वी बाहेर आलेल्या कुख्यात मोहम्मद अनिस माेहम्मद हनीफ उर्फ ‘बोक्या’ याने हॉटेलचालक वृद्धाला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दीड लाखाची सोन्याची चेन, रोख ५ हजार रुपये आणि मोबाइल लुटल्याची घटना २२ जून रोजी मध्यरात्री बसस्थानक परिसरातील शांग्रीला हॉटेल येथे घडली. क्रांती चौक पोलिसांनी त्याला अटक केली असून, लुटलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याची रवानगी पुन्हा हर्सूल कारागृहात केली.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार सलीम अकबर अली कुडचीवाला (६१, रा. सिरीन व्हिला, दिल्लीगेट परिसर) हे २२ जून रोजी रात्री त्यांच्या हॉटेलमध्ये बसलेले होते. त्या वेळी आरोपी अनिस बोक्या तेथे गेला आणि आरडाओरड करीत तक्रारदार यांना शिवीगाळ करू लागला. तक्रारदार यांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करीत मारहाण करू लागला. त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची चेन, ३० हजारांचा मोबाइल आणि खिशातील पाच हजार रुपये हिसकावून घेतले आणि तो तेथून पसार झाला. या घटनेनंतर सलीम कुडचीवाला यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक डॉ. जी.एच. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष राऊत, कर्मचारी नसीम पठाण, हवालदार मनोज चौहान, संतोष सूर्यवंशी आणि कर्मचाऱ्यांनी तपास करून आरोपी बोक्याला अटक केली. त्याच्याकडून लुटलेली सोनसाखळी आणि मोबाइल जप्त केला.
------------------------
आठ दिवसांनंतर बोक्याची रवानगी जेलमध्ये
आरोपी अनिस बोक्या लुटमारीच्या गुन्ह्यात ९ महिने जेलमध्ये होता. तो आठ दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी त्याला ठाण्यात बोलावून कोणताही गुन्हा करू नको, असा दम भरला होता. यानंतर दोन दिवसांनी त्याने हॉटेलचालकास लुटले. न्यायालयाने आज त्याची रवानगी हर्सूल जेलमध्ये केली आहे.