अंगणवाडीतील खिचडी दर्जाहीन
By Admin | Published: July 30, 2014 12:38 AM2014-07-30T00:38:08+5:302014-07-30T01:01:26+5:30
घनसावंगी : तालुक्यात प्रकल्प १ व २ मिळून अंगणवाड्या चालविल्या जातात. लहान अंगणवाड्या २५ तर मोठ्या २५३ अंगणवाड्या आहेत.
घनसावंगी : तालुक्यात प्रकल्प १ व २ मिळून अंगणवाड्या चालविल्या जातात. लहान अंगणवाड्या २५ तर मोठ्या २५३ अंगणवाड्या आहेत. कार्यकर्तीची एकूण संख्या २४६ आहे. तर मदतनीस २२७ एवढी असताना अंगणवाड्यांतून दर्जाहीन पोषण आहार तालुक्यात दिला जातो. याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याची तक्रार पालकांकडून होत आहे.
अंगणवाडीमधून लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या आहारात कडधान्याची उसळ, गव्हाच्या तुकड्याचा शिरा, मसूर, मूग पुलाव, वरण भात, खिचडी याप्रमाणे प्रमाणित करण्यात आलेला आहे. काही अंगणवाड्यांमधून तर मेनूच गायब झालेला आहे. यामध्ये मसूर व मूग शिरा कधीच बालकांना दिला नसल्याची तक्रार मातांची आहे. अंगणवाड्यांमध्ये दररोज फक्त पिवळा भात दिला जातो. त्यात तेल नाही, जिरे नसतात. प्रमाणही अत्यल्प असते. पोषण आहारात दिलेला माल हा काही बचत गटामार्फत दिला जातो. व आर्ध्यांना फेडरेशनकडून दिला जातो.
१ कोटी २५ लाख खर्च
पोषण आहारासाठी तालुक्यात जवळपास १ कोटी २५ लाख रुपये खर्च शासन करते. परंतु हा पैसा सर्व बचत गटाच्या व कार्यकर्ती व मदतनिसाच्या घशात जात असल्याची जोरदार चर्चा आहे.
शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे खिचडीचे वाटप करण्यात येत नसल्याच्या तक्रारी होत आहे. अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस हे सर्व गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या जवळची असल्यामुळे त्या कोणासही जुमानत नाहीत. हे चित्र सध्या तालुक्यात आहे.
अंगणवाड्यातील खेळाचे साहित्यही मोडकळीस आलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शैक्षणिक साहित्य व खेळणे प्रशासनाकडून मिळाले नसल्याचे अंगवाड्यांमधून सांगण्यात आले.
अंगणवाडीतील बालकांना बसण्यासाठी असलेल्या चटया बालकांऐवजी मदतनीस व कार्यकर्त्यांच्या घरी दिसून येत आहेत. गावामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये त्याचा उपयोग केला जात असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळते. (वार्ताहर)
घाणीचे साम्राज्य
अंगणवाड्यांजवळ नालीचे पाणी, उकिरडे, यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अंगणवाडीचा दर्जा सुधारावा व दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. प्रभारी बालप्रकल्प अधिकारी एस.एन. झरे म्हणाल्या की, तक्रार आल्यास व पालकांनी फोन केल्यास त्वरित अंगणवाड्यांमध्ये जावून पाहणी करून दोषी आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल.