...अन् मांडलामध्ये जन्मानंतर तासाभरात ९० टक्के शिशूंना मिळू लागले आईचे दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:02 AM2021-06-28T04:02:11+5:302021-06-28T04:02:11+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : जन्मानंतर तासाभरात नवजात शिशूला आईचे दूध मिळाले तर अनेक गोष्टींपासून शिशूचे संरक्षण होते. पण मध्यप्रदेशातील ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जन्मानंतर तासाभरात नवजात शिशूला आईचे दूध मिळाले तर अनेक गोष्टींपासून शिशूचे संरक्षण होते. पण मध्यप्रदेशातील मांडला जिल्हा रुग्णालयात जन्मानंतर शिशूंना लगेच आईचे दूध पाजण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यासाठी रुग्णालयातील काही गोष्टी कारणीभूत होत्याच, सोबत रुढी-परंपरेमुळे जन्मानंतर आईचे दूध पाजण्याऐवजी मध दिले जात असे. परंतु यात सुधारणा झाली आणि येथे जन्मानंतर तासाभरात ९० टक्के शिशूंना आईचे दूध मिळू लागले. या सगळ्या सुधारणेत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील एका परिचारिकेचा सहभाग राहिला आहे.
स्टेला रंगारे असे या परिचारिकेचे नाव आहे. त्या घाटीतील नवजात शिशू व अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) येथे कार्यरत आहेत. २०१७ मध्ये नेशनवाईड क्वाॅलिटी ऑफ केअर नेटवर्कचे (एनक्यूओसीएन)सदस्य डाॅ. मेहताब सिंग, डाॅ. केदार सावळेश्वरकर यांनी नवजात शिशू विभागाला भेट देत विभागप्रमुख डाॅ. एल. एस. देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ‘एनआयसीयू’तील सेवेची गुणवत्ता वाढीवर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या कार्यशाळेत ‘एनक्यूओसीएन’चे डाॅ. विक्रम दत्ता यांनी डाॅक्टर, परिचारिकांना प्रशिक्षण दिले. जवळपास ३० परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील १० परिचारिका या ट्रेनर्स झाल्या. यात स्टेला रंगारे यांचा समावेश होता.
स्टेला रंगारे या मेंटाॅर म्हणून मध्य प्रदेशातील मांडला जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या. पथकात डाॅ. श्रीविस्ताव आणि इतर होते. मांडला जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. जन्मानंतर तासाभरात आईचे दूध न मिळण्याची कारणे जाणून घेतली. तेव्हा जन्मानंतर पायाचा शिक्का मारणे, टॅग लावणे, व्हिटॅमिनचे इंजेक्शन देणे, नातेवाईकांना दाखविणे, या सगळ्यात तासाभरानंतर शिशू आईजवळ येत. शिवाय रुढी-परंपरेमुळेही नातेवाईकही आधी शिशूला मध देत असत. यामुळे शिशूंमध्ये इन्फेक्शनचा दर अधिक होता.
चौकट...
अतिदक्षता विभागात दाखल होण्याचे प्रमाण घटले
अनेक दिवसांच्या प्रशिक्षण, प्रयत्नांनंतर यात बदल झाला आणि याठिकाणी जन्मानंतर ९० टक्के शिशूंना तासाभरातच दूध मिळू लागले. यामुळे जन्मानंतर नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले. यासंदर्भात ‘एनएचएम’,‘मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ॲण्ड वेल्फेअर गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया’ आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केस स्टोरी प्रकाशित केली आहे. मेट्रन विमल केदार, नवजात शिशू विभागप्रमुख डाॅ. एल. एस. देशमुख यांचे सहकार्य मिळाले, असे स्टेला रंगारे म्हणाल्या.
-----
फोटो ओळ...
प्रशिक्षण देताना परिचारिका स्टेला रंगारे आणि इतर अधिकारी.
परिचारिका स्टेला रंगारे.