अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे मराठवाड्यातील ३६ हजार जणांना २,८७२ कोटींचे कर्जवाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:52 IST2025-04-12T15:51:58+5:302025-04-12T15:52:47+5:30
Annasaheb Patil Mahamandal: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळामुळे बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे मराठवाड्यातील ३६ हजार जणांना २,८७२ कोटींचे कर्जवाटप
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजातील बेरोजगार तरुण, तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा उद्योग- व्यवसाय करावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने बिनव्याजी कर्ज देण्यात येते. महामंडळाच्या या योजनेंतर्गत मराठवाड्यातील तब्बल ३६ हजार १७८ जणांनी तब्बल २,८७२ कोटी ५६ लाख रुपये कर्ज घेऊन स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू करीत आदर्श निर्माण केला आहे.
राज्यात विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ आहे. याच धर्तीवर सन २०१८ साली राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या वतीने मराठा समाजातील गरजूंना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर महामंडळाच्या कर्ज परतावा योजनेसाठी अर्जदार पात्र असल्याचे पत्र देण्यात येते. या पत्रासह अर्जदाराने बँकेकडे कर्ज प्रस्ताव करावा लागतो. अर्जदाराने बँकेच्या कर्जाचा हप्ता अदा केल्यानंतर त्याच्या खात्यात व्याजाची रक्कम महामंडळाकडून जमा करण्यात येते. महामंडळाच्या या वैयक्तिक कर्ज योजनेंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील ६४ हजार ६४१ अर्जदार पात्र ठरले होते. यापैकी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांनी ३६ हजार १७८ जणांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करीत त्यांच्या प्रकल्पासाठी २ हजार ८७२ कोटी ५६ लाख रुपये कर्जवाटप केले. या कर्जाचे नियमित हप्ते भरून परतफेड करणाऱ्या कर्जदार लाभार्थ्यांना २८६ कोटी ९४ लाख रुपये परतावा दिल्याची माहिती महामंडळाचे विभागीय समन्वयक प्रवीण अगवणे यांनी दिली.
१,५८३ प्रकरणे बँकेकडे मंजुरीविना पडून
महामंडळाने मंजूर केलेले १,५८३ जणांचे कर्ज प्रस्ताव मराठवाड्यातील विविध बँकांकडे प्रलंबित आहेत. मागील वर्षभरात बँकांनी हे प्रस्ताव फेटाळलेले नाहीत. यामुळे या अर्जदारांचा उद्योग, व्यवसाय बँकेच्या निर्णयावर अवलंबून आहे.
५४१ जणांना नाकारले कर्ज
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसाठी पात्र असलेल्या ५४१ जणांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी नाकारले आहेत. बऱ्याचदा कर्ज प्रस्ताव का नाकारत आहे, याचे कारणही बँकांकडून अर्जदारांना दिले जात नाही.
जिल्ह्याचे नाव --- लाभार्थी संख्या---- कर्जवाटप (कोटीमध्ये)
छत्रपती संभाजीनगर--१२,२६३----१,०३५
जालना---५,५२५----३८८
बीड---४,३१२----३,२८.३९
परभणी--- ५,१७१----११८.२८
लातूर--- ३,८४०----३४०.३३
धाराशिव--- ५,९६५----४७८.२२
नांदेड--- १,६७०----१२२
हिंगोली--- ९०५----६२.३४