संभाजीराजेंच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाचा १९ ऑगस्ट रोजी वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:02 AM2021-08-18T04:02:11+5:302021-08-18T04:02:11+5:30
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाचा पाचवा वर्धापनदिन १९ ऑगस्ट रोजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हर्सूल परिसरातील मधुरा लॉन ...
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाचा पाचवा वर्धापनदिन १९ ऑगस्ट रोजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हर्सूल परिसरातील मधुरा लॉन येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समन्वयक विजय काकडे पाटील, प्रा. चंद्रकांत भराट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, कोपर्डीच्या घटनेनंतर पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा ९ ऑगस्ट २०१६ रोजी औरंगाबादेतून निघाला. या मोर्चाने संपूर्ण मराठा समाजाला एक दिशा दिली. काेपर्डीतील पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवावे, मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर ५८ मूकमोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाच्या या ऐतिहासिक मोर्चाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. मराठा क्रांती मोर्चाची स्थापना औरंगाबादेतून झाल्याने मराठा क्रांती मोर्चाचा वर्धापन दिन येथे साजरा करण्याचा निर्णय समाजबांधवांनी घेतला. पाच वर्षांत मराठा समाजाला काय मिळाले, याविषयी चर्चा करण्यासाठी आणि समाजाच्या मागण्या आणि आजची परिस्थिती यावर चर्चा यावेळी केली जाईल. खासदार छत्रपती संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लाभली आहे. राजकीय पक्षातील मराठा बांधवांना या कार्यक्रमासाठी तोंडी निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र त्यांनी राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या कार्यक्रमास केवळ मराठा समाजबांधव म्हणून उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला सुरेश वाकडे, किशोर चव्हाण, सतीश वेताळ, मनोज गायके, प्रा. शिवानंद भानुसे, सुनील कोटकर, आत्माराम शिंदे, सुकन्या भोसले, रेखा वाहटुळे, रवींद्र वाहटुळे, प्रदीप हरदे, गणेश मोटे, विलास औताडे, योगेश औताडे आदींची उपस्थिती होती.
चौकट
मराठा क्रांती मोर्चात काही अपप्रवृत्तींनी शिरकाव केला. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचा गैरवापर सुरू केला. त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले नसल्याचे संयोजकांनी सांगितले. यानंतरही ते जर कार्यक्रमास आले तर त्यांना विचारपीठावर बसू दिले जाणार नसल्याचे संयोजकांनी यावेळी नमूद केले. मराठा क्रांती मोर्चात गट तट पडल्याचे यावेळी त्यांनी मान्य केले.