औरंगाबादेतील ऑक्सिजन निर्मिती प्लांट घोषणेपुरताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 03:19 AM2021-04-05T03:19:25+5:302021-04-05T03:19:34+5:30
इतर जिल्ह्यांवर राहावे लागते अवलंबून
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी, ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागत आहे. गतवर्षी लिक्विड ऑक्सिजन निर्मिती प्लांटची घोषणा करण्यात आली; परंतु वर्षभरातही औरंगाबादेत ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभा राहू शकला नाही. या प्लांटच्या उभारणीकडे दुर्लक्ष करून पुरवठादारांनाच एकप्रकारे ‘ऑक्सिजन’ पुरविले जात असल्याची टीका लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
मराठवाड्यात गतवर्षी ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे औरंगाबादसह जालन्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारण्यात येईल, असे जाहीर करून त्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांना आवाहनही केले. पुणे, रायगड, ठाणे, नागपूर या ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प असल्याने तेथून मराठवाड्यापर्यंत ऑक्सिजनच्या वाहतुकीत बराच वेळ जातो. त्यामुळे औरंगाबादच्या प्रकल्पातून महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होईल. १०० ते २०० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन निर्मिती या प्रकल्पातून होईल, असे सांगण्यात आले. प्रकल्प उभारणाऱ्या काही उद्योजकांशी चर्चा करण्यात आली. त्यातील दोन उद्योजकांनी औरंगाबाद आणि जालन्याला पसंती दिली. तातडीने सर्व परवानग्या मिळाव्यात, अशी अट उद्योजकांनी टाकली; परंतु प्रत्यक्षात पुढे काही झाले नाही. घोषणा करणाऱ्या मंत्र्यांसह प्रशासनाला या प्लांटचा विसर पडला. रुग्णालयांत ऑक्सिजन टँक उभारण्यात येत आहे. त्यात पुरवठादारांकडून लिक्विड ऑक्सिजन पुरविण्याशिवाय काहीही केले जात नसल्याने ऑक्सिजनसाठी रुग्णांचा जीव जाण्याची वेळ ओढावत असल्याची ओरड होत आहे.
पालकमंत्री घोषणा करतात; परंतु त्यानंतरही प्लांट झालेला नाही. याला कोणीतरी जबाबदार आहे की नाही. जो ऑक्सिजन पुरवितो, त्याचे काही प्रेशर आहे का? हा प्लांट झाल्यास सर्व शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविता येईल. वाहतुकीत वेळ जाणार नाही. अधिक पैसेही मोजावे लागणार नाही.
- इम्तियाज जलील, खासदार