पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरसाठी घोषणा विरल्या हवेत अन् सूचना राहिल्या कागदावरच

By संतोष हिरेमठ | Published: September 27, 2024 01:10 PM2024-09-27T13:10:52+5:302024-09-27T13:15:02+5:30

वर्षभरापूर्वी टूर्स ऑपरेटर्सनी दिलेल्या ‘फीडबॅक’कडेही कानाडोळाच, परदेशी पाहुणे वाढणार कसे?

Announcements for tourism capital Chhatrapati Sambhajinagar are thin air and instructions remain only on paper | पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरसाठी घोषणा विरल्या हवेत अन् सूचना राहिल्या कागदावरच

पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरसाठी घोषणा विरल्या हवेत अन् सूचना राहिल्या कागदावरच

छत्रपती संभाजीनगर : राज्याची पर्यटन राजधानी आणि पर्यटन जिल्हा म्हणून मान मिळालेल्या छत्रपती संभाजीनगरात पर्यटन विकासात समस्यांचा डोंगर आहे. पर्यटननगरीसाठी शासनाकडून होणाऱ्या घोषणा अन् टूर्स ऑपरेटर्सकडून होणाऱ्या सूचना फक्त कागदावरच राहतात. त्याचे पुढे काहीही होत नसल्याची ओरड होतेय. त्यामुळे ‘युनेस्को’च्या यादीतील दोन ऐतिहासिक वारसास्थळांसह अनेक पर्यटनस्थळे असणाऱ्या शहराकडे परदेशी पर्यटकांचा ओघ वाढणार कसा, असा उपस्थित होत आहे.

‘इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स’चे (आयटो) चारदिवसीय ३८ वे कन्व्हेन्शन (राष्ट्रीय अधिवेशन) गतवर्षी २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान शहरात पार पडले. परिषदेनंतर टूर ऑपरेटर्सनी अजिंठा, वेरूळ लेणींसह पर्यटनस्थळांना भेटी दिल्या आणि तेथील परिस्थितींविषयी संघटनेला ‘फिडबॅक’ दिला. त्यांनी दिलेल्या सूचनांवर आजवर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

पर्यटननगरी, पर्यटन जिल्हा, स्वदेश दर्शन अन् ‘प्रसाद’ योजना
शहराला पर्यटन राजधानी आणि पर्यटन जिल्हा म्हणून मान मिळाला. अजिंठा आणि वेरूळ लेणींचा केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेत समावेश करण्यात आला. जानेवारीत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘तीर्थस्थान जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान’ (प्रसाद) योजनेत घृष्णेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला; परंतु पर्यटकांसाठी सोयीसुविधांच्या विकासाची नुसतीच प्रतीक्षा आहे.

टूर्स ऑपरेटर्सनी अजिंठा, वेरूळ लेणीतील या स्थितीकडे वेधले होते लक्ष
- छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा या रस्त्याची ठिकठिकाणी स्थिती चांगली नाही : वर्षभरानंतरही हीच अवस्था.
- परदेशी पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही आणि जी अस्तित्वात आहे ती दयनीय आहे. : आजही हीच अवस्था.
- अजिंठा लेणीत शेड असलेले बेंच नाहीत. काही ठिकाणी वारंवार पादत्राणे काढावी लागतात. त्यावर पर्याय असावा : काहीही पर्याय काढला नाही.
- अजिंठा लेणीत फेरीवाल्यांकडून छळ केला जातो. : आजही फेरीवाले पर्यटकांच्या मागे लागतात.
- अजिंठा लेणीत पर्यटकांना पर्यावरण आणि स्थानिक सुविधा वापरण्यासाठी, पार्किंग, बस आणि लेणींना भेट देण्यासाठी अशाप्रकारे ४ वेळा पैसे मोजावे लागतात. हे सर्व एका तिकिटात एकत्रित असू शकतात. : आजही ४ वेळा पैसे मोजावे लागतात.
- अजिंठा लेणीतील बस पर्यटकांसाठी अनुकूल नाहीत : वेरूळप्रमाणे येथे गोल्फ कार्ट सुरू करण्याच्या हालचाली; पण जुन्या बस कायम.
- अजिंठा, वेरूळ लेणी येथील पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण हवे : लेणी पाहण्यासाठी एकाच वेळी गर्दी कायम.

पाच वर्षांपासून काम सुरूच...
अजिंठा येथील वाघूर नदीवरील पुलांचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. अजून काम पूर्ण झाले नाही. जुना पूल पडायला आला आहे. तो पूल कधीही कोसळू शकतो. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. नवीन पुलांचे अर्धवट बंद पडलेले काम शेजारी दिसत आहे. 

परदेशी पर्यटकवाढीसाठी हवे प्रयत्न
पर्यटन मंत्रालयाने पर्यटनस्थळांची पुन्हा प्रसिद्धी सुरू करणे आवश्यक आहे. कारण कोरोनापूर्वीची परदेशी पर्यटकांची संख्या अद्यापही ओलांडलेली नाही. पर्यटनस्थळांची प्रसिद्धी होत नाही, त्यासाठी जाहिरातींवर खर्च होत नाही तोपर्यंत परदेशी पर्यटकांची वाढ होणार नाही.
- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी (एटीडीएफ)

सूचनांची अंमलबजावणीच नाही
वर्ष २०२३ मध्ये संपूर्ण भारतातून पर्यटन व्यावसायिक परिषदेनिमित्त शहरात आले होते. तेव्हा त्यांनी पर्यटनस्थळांना भेटी देऊन पर्यटकांना चांगला अनुभव येण्याच्या दृष्टीने काही सूचना केल्या होत्या. परंतु दुर्दैवाने त्या सूचना अमलात येण्याची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.
- जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)

चांगल्या सुविधांसाठी कायम प्रयत्नशील
पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कायम प्रयत्नशील आहोत. आगामी काळात आणखी चांगल्या सुविधा देऊ. अनेक कामे सुरू आहेत. बीबी-का-मकबऱ्याचे रूप लवकरच बदलेल.
- डाॅ. शिवकुमार भगत, अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद), भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

पर्यटननगरीत गेल्या ८ महिन्यांत किती पर्यटक?
महिना - देवगिरी किल्ला- बीबी का मकबरा- औरंगाबाद बुद्ध लेणी- अजिंठा लेणी- वेरूळ लेणी (भारतीय/परदेशी)
जानेवारी-७३,३६२/५२४-१,३४,४६६/१,३०१-१७,४४९/२४३-५४,९७३/१७६४-१,९७,०४२/२,३८०
फेब्रुवारी-४२,४८९/५९७- ८९,१५३/१८८-७,१८४/१७५- ३०,००८/२,१२९-१,२१,६७८/२,८९२
मार्च- २४,७३६/३५४- ६२,३४८/९५०- ५,९९१/१४२-२२,८५९/१,६२२-१,१९,०८६/२,१६६
एप्रिल-२३,३७३/१२८-७३,९२४/३८६-५,६२०/४५- १३,८२९/४९७-८५,७१७/७५१
मे-२७,६३६/७३-१,०४,६६०/२७०-६,४५७/१८-२१,२२०/२७५-१,४०,४९१/४२१
जून-३८,८५४/६०- १,१५,६६८/२४८-९,०३२/४९-२७,०२१/२८७-१,३९,६७१/३८५
जुलै-४४,८३२/११२-८१,१२३/३२१-१२,६२६/४२- ३७,३२०/३७०-१,३७,९९६/५०५
ऑगस्ट- ५२,१५०/१२३-८६,८५६/३७९-१२,६२७/३४-४३,८३८/६१०-१,३३,७९८/७,६६५

Web Title: Announcements for tourism capital Chhatrapati Sambhajinagar are thin air and instructions remain only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.