संतापजनक! झोपमोड होते म्हणून तीन श्वानांना चेम्बरमध्ये डांबून जिवे मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:02 PM2022-05-20T12:02:42+5:302022-05-20T12:06:03+5:30
‘आपला’ संघटनेच्या स्वयंसेवकांना बंद नालीच्या जाळीतून श्वानांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला.
औरंगाबाद : श्वानांच्या ओरडण्यामुळे झोपमोड होते, म्हणून सिंधी कॉलनीत दोन कुत्री आणि एका पिलाला नालीच्या चेम्बरमध्ये डांबून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी समोर आली.
औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या (आपला) स्वयंसेवकांच्या हा प्रकार नजरेस पडताच त्यांनी या श्वानांना वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. या प्रकरणी संघटनेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. सिंधी कॉलनीतील रहिवासी राजू परसवानी यांच्या घराशेजारी असलेल्या श्वानांच्या ओरडण्याचा त्यांना त्रास होतो. यामुळे गुरुवारी त्यांनी महापालिकेच्या पथकाला बोलावून हे श्वान उचलून नेण्याचे सांगितले होते. मात्र यावर ‘आपला’ संघटनेने आक्षेप घेतल्याने मनपाने ते श्वान परत कॉलनीत आणून सोडले.
यानंतर दोन कुत्री आणि दोन महिन्यांच्या पिलाला कॉलनीतील नालीमध्ये टाकण्यात आले. या श्वानांना जिवे मारण्याच्या उद्देशाने नालीचे तोंड माती टाकून बंद करण्यात आले होते. तेथून जाणाऱ्या ‘आपला’ संघटनेच्या स्वयंसेवकांना बंद नालीच्या जाळीतून श्वानांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी मोठे परिश्रम करून नाली आणि चेम्बर उघडून श्वानांना सुखरूप बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. या श्वानांवर विषारी स्प्रे फवारण्यात आल्याचे संघटनेच्या बेरील सांचिस यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात नमूद केले.
तक्रार अर्ज आला आहे
याविषयी जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘आपला’ संघटनेचा तक्रार अर्ज आला आहे. त्या श्वानांचा उद्या शोध घेऊन त्यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केल्यानंतर त्यांना काही इजा झाली आहे का, याविषयी माहिती घेऊन गुन्हा नोंदविण्यात येईल.