संतापजनक ! कोरोना चाचणीसाठी आलेल्या वृद्धेला झाडाखाली बसवून दिला ऑक्सिजन सपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:00 PM2020-08-31T12:00:05+5:302020-08-31T18:35:44+5:30
वाळूजच्या गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार
वाळूज महानगर (औरंगाबाद ) : कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी करण्यासाठी आलेल्या ६५ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने खाटा रिकाम्या असतानाही विलगीकरण केंद्राबाहेर झाडाखाली तिला आॅक्सिजन सिलिंडर लावल्याचा गंभीर प्रकार शनिवारी दुपारी वाळूजच्या गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये घडला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या अमानवीय कृत्याबद्दल कोरोना चाचणीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
आरोग्य विभागाच्या वतीने वाळूजच्या गरवारे कम्युनिटी सभागृहात दोन महिन्यांपूर्वी नागरिकांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्ती व इतरांना या सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यासाठी जवळपास ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या केंद्रामध्ये आवश्यक सुविधा नसल्याने केंद्र बंद करून तेथे केवळ संशयितांचे स्वॅब घेण्यात येत आहेत.
कमळापूर परिसरातील वृद्ध महिला शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सुनेसोबत वाळूजच्या गरवारे सेंटरमध्ये स्वॅब देण्यासाठी आली होती.
दरम्यान, वृद्धेला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे तिने सुनेला सांगितले. त्यानंतर तात्काळ उपचार करण्याची विनवणी सुनेने आरोग्य कर्मचाऱ्यांना केली. आरोग्य सेवक-सेविका, लॅब टेक्निशियन, आशा कार्यकर्त्या आदी मदतीसाठी गेले. मात्र, केंद्रात ५० खाटा रिकाम्या असतानाही या कर्मचाऱ्यांनी वृद्धेला बाहेर चक्क झाडाखालीच आॅक्सिजनचे सिलिंडर लावले. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, १०८ रुग्णवाहिका न आल्याने तासाभरानंतर दुसरी रुग्णवाहिका बोलावून या वृद्धेला गंगापूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे या वृद्धेची हेळसांड झाली. कोरोना चाचणीसाठी आलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागाच्या या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
महिलेचा अँटिजन टेस्टचा अहवाल निगेटिव्ह
वाळूज येथे आॅक्सिजन सिलिंडरसह झाडाखाली बसविलेल्या महिलेला घाटीत दाखल करण्यात आले. याठिकाणी दाखल झाल्यानंतर महिलेची कोरोनाच्या निदानासाठी अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती घाटीेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली.
आरोग्य विभागाकडून सारवासारव
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेश कांबळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सदरील महिला वृद्ध असल्यामुळे तिला चांगले उपचार मिळावेत यासाठी गंगापूर रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले, तर नोडल अधिकारी डॉ. उज्ज्वल चव्हाण यांनी गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये नवीन कर्मचारी आल्यामुळे अनवधानाने या वृद्धेला झाडाखालीच सिलिंडर लावल्याची कबुली दिली.