हिडींबाची पूजा करणारे अनोखे पारध गाव
By Admin | Published: September 14, 2015 11:32 PM2015-09-14T23:32:56+5:302015-09-15T00:31:14+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवर वसलेले पारध (शाहुराजा) हे गाव ऐतिहासिक, सांस्कृतिकतेबरोबरच पौराणिक परंपरा शेकडो वर्षापासून जपणारे गाव.
पारध : भोकरदन तालुक्यातील मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवर वसलेले पारध (शाहुराजा) हे गाव ऐतिहासिक, सांस्कृतिकतेबरोबरच पौराणिक परंपरा शेकडो वर्षापासून जपणारे गाव. एखाद्या गावात देवी-देवतांची पूजा, त्यांची यात्रे म्हटले तर नवल वाटण्यासारखे नाही. पारधची यात्रा म्हणजे नवलच म्हणावे लागेल. ही यात्रा चक्क घटत्कोच माता हिडींबेच्या नावाने भरते आणि ही परंपरा शेकडो वर्षापासून अखंडपणे सुरु आहे. या यात्रेस सोमवारपासून सुरुवात होणार आहे.
ही यात्रा १४ सप्टेंबर म्हणजे सोमवारपासून तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचीही रेलचेल असणार आहे. लगतच्या विदर्भ, खान्देशासह मराठवाड्यातून हजारो भाविक हिडींबीच्या दर्शनासाठी पारध येथे डेरेदाखल होतात. त्या अनुषंगाने भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पारध ग्रामपंचायत प्रयत्नशिल असल्याची माहिती सरपंच गणेश लोखंडे, पं. स. सभापती संगीता लोखंडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून आम्ही सर्व बंदोबस्त चोख ठेवल्याचे पारध पोलिस ठाण्याचे स. पो. नि. किरण बिडवे यांनी सांगितले.
पारध हे जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व पौराणिक वारसा लाभलेले प्रसिध्द देवस्थान आहे. येथे कौरव पांडवाचे पूर्वज महाकवी व्यासांचे पिता महर्षि पाराशर ऋषींचे भव्य मंदीर आहे. पाराशर ऋषींची आवतार समाप्ती येथे झाल्याने या पुण्यभूमिला पारध असे नाव पडल्याचा उल्लेख आहे. नेमी याच काळात या भागात घटत्कोच माता हिंडीबी ही राक्षसीन काहीकाळ वास्तव्यास होती. तिने सुंदर स्त्रीचे रुप धारण करुन आपल्या अप्रतिम सौंदर्याने महाशक्तीसाठी भिमाला मोहीत केले व भीमासोबत विवाह केला म्हणून तिलाही देवत्व प्राप्त झाले, असा उल्लेख महाभारत ग्रंथात आहे. म्हणून पारध येथे भाद्रपद महिन्याच्या शुध्द द्वितीयेला महर्षी पाराशर ऋषी सोबतच हिडींबीचीही मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात येते. आणि या यात्रेला हिडींबा यात्रा उत्सव म्हणून शेकडो वर्षापासून ओळखल्या जातो. मिरवणूकीत वाघ्या-मुरळी, भजने आदी करमणूकीचे कार्यक्रम सादर होतात. तीन दिवस कुस्त्यांची दंगलही होते. यात्रेची जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी सरपंच गणेश लोखंडे, उपसरपंच सुरेश अल्हाट, पं. स. सभापती संगीता लोखंडे, देवीराम तेलंग्रे, पांडुरंग बोराडे, समाधान गुरुजी, परमेश्वर पाटील, दिलीप बेराड, देवेंद्र पाटील, रामदास राऊत, अमाल भुजारे, गजानन जंजाळ, विनोद तेलंग्रे, बाबासाहेब देशमुख, शेषराव भुसारे, शेखर श्रीवास्तव, प्रमोद सूरडकर हे प्रयत्नशील आहेत.