लंपास केलेली गुटख्याची आणखी ४५ पोती गुन्हे शाखेने पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:36 PM2019-06-15T22:36:37+5:302019-06-15T22:37:49+5:30
औरंगाबाद : पोलीस येण्यापूर्वीच पोटूळ शिवारातून एका कंटेनरमधून लंपास केलेला ४५ पोती गुटखा गुन्हे शाखेने शनिवारी पडेगाव परिसरातील एका ...
औरंगाबाद : पोलीस येण्यापूर्वीच पोटूळ शिवारातून एका कंटेनरमधून लंपास केलेला ४५ पोती गुटखा गुन्हे शाखेने शनिवारी पडेगाव परिसरातील एका घरातून जप्त केला. याप्रकरणी शेख रियाज नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. गुटख्याप्रकरणी अटकेतील आरोपींची संख्या आता चार झाली.
याविषयी अधिक माहिती अशी की, गुरुवारी(दि.१३) रात्री पोटूळ शिवारात गुटख्याचा कंटेनर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. या कारवाईत पहिल्या दिवशी पोलिसांनी तब्बल ३८ लाखांचा गुटखा, एक कंटेनर आणि एक मालवाहू टेम्पो जप्त केला. कंटेनरचालक रुवाब अली हजरत अली शेख (२७, रा. आझमगड, उत्तर प्रदेश), क्लीनर इंद्रेश श्रीमदनलाल निषाद (२८, रा. भगतपूर, आझमगड, उत्तर प्रदेश) आणि तौसीफ समद शेख (२०, रा. साजापूर) यांना अटक केली होती. पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी केली असता आरोपी ट्रकचालकाने त्याच्या संपर्कात रियाज नावाचा व्यक्ती असल्याचे सांगितले. त्याच्या सांगण्यावरून आपण हा कंटेनर येथे आणल्याचे त्याचे म्हणणे आहे. शिवाय पोलीस पोटूळ शिवारात दाखल होण्यापूर्वी आरोपी रियाजने कंटेनरमधून एका टेम्पोतून ४५ पोती गुटखा पडेगाव येथील एका घरात नेऊन ठेवला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज रियाजला अटक केली. पडेगावातील संशयित घरावर धाड टाकून तेथून गुटख्याची ४५ पोती जप्त केली. एवढेच नव्हे, तर दौलताबाद परिसरातील एका रस्त्यालगत बेवारस अवस्थेत सुगंधी तंबाखूची काही पोती आढळली. ही पोती दौलताबाद पोलिसांनी जप्त केली.
चौकट
म्हणे नेवासा येथून कंटेनर आणला
आरोपी कंटेनरचालकाने पोलीस कोठडीत पोलिसांना सांगितले की, तो ट्रान्स्पोर्टचालकाने त्याला हा कंटेनर पोटूळ शिवारात नेण्याचे सांगितले, यामुळे आपण नेवासा येथून कंटनेर औरंगाबादेतील पोटूळ येथे आणला. मात्र पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कंटेनरचालक खोटे बोलत असावा आणि हा गुटखा कर्नाटकमधून आणल्याचा पोलिसांना संशय आहे.