औरंगाबादच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा
By | Published: December 9, 2020 04:01 AM2020-12-09T04:01:31+5:302020-12-09T04:01:31+5:30
औरंगाबाद : मागील ७ वर्षापासून शहरात घेण्यात येणारा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने अल्पावधीत देशातील सर्वोत्कृष्ट पहिल्या १० महोत्सवात स्थान ...
औरंगाबाद : मागील ७ वर्षापासून शहरात घेण्यात येणारा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने अल्पावधीत देशातील सर्वोत्कृष्ट पहिल्या १० महोत्सवात स्थान पटाकावले आहे. यामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला आहे.
देशातील फिल्म सोसायटीची शिखर संस्था म्हणून फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया कार्यरत आहे.
देशात विविध महानगरात ३० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविण्यात येतात. फेडरेशनने त्या महोत्सवची यादी केली असून त्यांचे नियोजन, आयोजनानुसार क्रमवारी जाहीर केली. त्यात नववे स्थान औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवला दिले. या यादीत पाहिला क्रमांक गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आहे. त्यानंतर केरळ, कोलकाता, बेंगरुळ, मुंबई, चेन्नई, पुणे या बड्या शहरातील महोत्सवाचा नंबर लागतो. त्यास तोडीस तोड आपल्या शहरात महोत्सव भरविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सर्व बड्या शहरातील चित्रपट महोत्सवला १५ ते २० वर्ष झाली आहे. पण औरंगाबादने अवघ्या ७ वर्षात एवढी लोकप्रियता मिळविली की, पहिल्या टॉप टेनमध्ये जागा पटकावली आहे.
आणखी एक उल्लेखनीय म्हणजे, फि प्रेसीही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फि प्रेसीही जगभरातील महोत्सवामधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करते. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो. यंदा पुरस्कार निवडीसाठी फि प्रेसीने औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली होती. मागील सात वर्षात महोत्सवाद्वारे शहरातील रसिकांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय २८० चित्रपट पाहण्यास मिळाले आहेत.
चौकट
रसिकांनीच बनविला महोत्सव यशस्वी
जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट औरंगाबादच्या रसिकांपर्यंत पोहचावेत. कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणीव अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात या उद्देशाने उद्योजक, महोत्सवाचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांच्या संकल्पनेतून व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांच्या सहकार्याने महोत्सव घेण्यात येत आहे. राज्य सरकारचे पाठबळ मिळत आहे. औरंगाबादच्या रसिकांनी दाखविलेल्या प्रेमातून महोत्सवाने ९ क्रमांकावर स्थान मिळविले आहे.
निलेश राऊत
संयोजक, औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.