ऐन दिवाळीत भाढेवाढ! खासगी ट्रॅव्हल्सपाठोपाठ ‘एसटी’चा प्रवास महाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 13:42 IST2022-10-20T13:40:53+5:302022-10-20T13:42:17+5:30
आज मध्यरात्रीपासून एसटीची भाडेवाढ लागू होणार आहे

ऐन दिवाळीत भाढेवाढ! खासगी ट्रॅव्हल्सपाठोपाठ ‘एसटी’चा प्रवास महाग
औरंगाबाद : खासगी ट्रॅव्हल्सपाठोपाठ एसटीनेही ऐन दिवाळीत भाढेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. ही भाडेवाढ ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहील. त्यामुळे दिवाळीत ‘एसटी’चाही प्रवास काहीसा महाग ठरणार आहे. साधी, जलद, निमआराम, साधी शयनआसनी, वातानुकूलित शिवाई, वातानुकुलित शिवशाही बसने दिवाळी प्रवास करणाऱ्यांना अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे.
दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाच्या भाडेवाढ सुत्रानुसार; गर्दीच्या हंगामात महसूल वाढीसाठी ३० टक्क्यांपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही २० ते २१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री बारानंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी केली जाणार आहे. ही भाडेवाढ ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. औरंगाबाद ते नागपूर शिवशाही बसचे भाडे १,११० रुपये आहे. भाडेवाढीच्या कालावधीत नागपूर जाण्यासाठी १,२०५ रुपये मोजावे लागतील.