दहा बाय दहाच्या खोलीतून आयपीएलवर लाखोंचा सट्टा; औरंगाबादमध्ये आणखी एका सट्टयाचा पोलिसांनी केला पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 01:53 PM2020-10-20T13:53:02+5:302020-10-20T13:58:04+5:30
आठ दिवसापूर्वी जिंसी पोलिसांनी सट्टा अड्डा चालविणाऱ्या एका बुकीला पकडले होते.
औरंगाबाद: इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळविणाऱ्या पिता- पुत्र बुकींना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने काचीवाडा येथे धाड टाकून पकडले. १८ आणि १९ ऑक्टोबर रोजीच्या सामन्यावर शहरातील अनेकांनी अनुक्रमे सुमारे ७० ते ८० लाख आणि २ लाख ३८ हजार ४० रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याचे समोर आले. नेमीचंद शांतीलाल कासलीवाल (५६)आणि आकाश नेमीचंद कासलीवाल (२२रा . काचीवाडा)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, आयपीएल क्रिकेट सामन्यावर शहरात सट्टा खेळला जात असल्याचे सर्वज्ञात आहे. चोरट्या मार्गाने हा सट्टा चालतो. आठ दिवसापूर्वी जिंसी पोलिसांनी सट्टा अड्डा चालविणाऱ्या एका बुकीला पकडले होते. ही कारवाई ताजी असतांना काचीवाडा येथील एका घरात कासलीवाल पितापुत्र सट्टा अड्डा चालवित असल्याची माहिती रात्री पोलिसांना मिळाली. यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, कर्मचारी व्ही. आर. निकम, एम आर. राठोड, व्ही.जे. आडे, एम व्ही विखनकर, ए.आर. खरात , व्ही.एस. पवार,एस . जें सय्यद, महिला कर्मचारी पी.एम . सरसांडे, शृती नांदेडकर यांनी सोमवारी रात्री काचीवाडा येथील घरावर छापा टाकला. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात पोलीस शिपाई इमरान पठाण यांनी सरकारतर्फे तक्रार नोंदविली.
दहा बाय दहाच्या खोलीतून लाखोंचा सट्टा
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दहा बाय दहाच्या खोलीत आरोपी नेमीचंद आणि आकाश हे पितापुत्र आयपीएलचा सट्टा बुकींग करीत असल्याचे दिसून आले. या कारवाईत नेमीचंद आणि आकाशने १८ ऑक्टोबरच्या सामन्यावर ७० ते ८० लाख रुपयांची देवाण- घेवाण झाल्याचे घटनास्थळी सापडलेल्या बुकींग वहि वर सट्टा लावणाऱ्याची नावे आणि रक्कम लिहिलेली दिसून आले. १९ रोजी च्या सामन्यावर २ लाख ३८ हजार ४० रुपयांचा सट्टा शहरातील जुगाऱ्यानी खेळ्ल्याचे समोर आले.