पुढील दहा दिवसांत महाराष्ट्रात आणखी एक लाख कोटींची गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत
By बापू सोळुंके | Published: August 12, 2024 07:04 PM2024-08-12T19:04:43+5:302024-08-12T19:05:54+5:30
आतापर्यंत ५३ हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात औद्योगिक क्रांती
छत्रपती संभाजीनगर : येथील ऑरिक सिटीच्या डीएमआयसी मध्ये चार उद्योगांनी तब्बल ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात औद्योगिक क्रांती होणार आहे. आता पुढील आठ ते दहा दिवसात राज्यात आणखी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूकीच्या घोषणा करण्यात येत असल्याचा फेक प्रचार विरोधकांनी सुरू केला आहे . मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि माझा आज येथे मासिआने सत्कार करून विरोधकांना चपराक दिली असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले.
उद्योगमंत्री म्हणाले की, ऑरिक सिटीमध्ये लुब्रिझोल, अथर एनर्जी, टाेयटो- किर्लोस्कर आणि जेएसडब्ल्यू मोबिलिटी या चार कंपन्यांनी सुमारे ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. या गुंतवणूकीमुळे मसिआ ने उद्योगमंत्री म्हणून माझा आणि कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा सत्कार आज केला. या कंपन्यांमुळे येथील सुमारे १५ हजार तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या कंपन्यांना ज्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे आहे,तशा प्रकारचे कौशल्य विकासाचे ट्रेनिंग युवकांना देण्याचे कंपन्यांना सांगितले आहे. तसेच कंपन्यांना ज्या प्रकारचे स्पेअर पार्ट लागतील. त्यासाठी आवश्यक तशी इको सिस्टीम येथे आहे. मात्र लघू उद्योजकांशी संवाद साधून येथेच व्हेंडर साखळी विकसित करण्याच्या सूचनाही कंपन्यांना दिल्याचे सामंत म्हणाले. मराठवाड्यात ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असली तरी पुढील आठ ते दहा दिवसांत आणखी एक लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. ही गुंतवणूक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या गुंतवणूकीमुळे विरोधक ही गुंतवणूक केवळ निवडणुकीपुरती असल्याचा फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला येथील उद्योजकांनी आज आमचा सत्कार आयोजित करून उत्तर दिले सस असल्याचे उद्याेगमंत्री म्हणाले.
मराठा आरक्षणावर विरोधकांना राजकारण करायचे
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अथवा नाही, याविषयी निर्णय घेण्याासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी दांडी मारली. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टीकले, मात्र उद्धव ठाकरे यांनी वेळीच वकिल न दिल्याने सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले नाही. अशा विरोधकांना केवळ आरक्षणावर राजकारण करायचे असल्याचाच आरोप सामंत यांनी केला.
नदीजोड प्रकल्पाद्वारे तीन वर्षात मराठवाड्याला पाणी
कोकणात वाहुन जाणाऱ्या नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्यात आणून तीन वर्षात येथील पाणी प्रश्न कायमचा सोडविला जाणार असल्याचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी येथे एका प्रश्नाचे उत्तर देताना नमूद केले. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार निधी कमी पडू देणार नसल्याचे सावे यांनी स्पष्ट केले.