एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा नोटांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 01:15 PM2021-12-21T13:15:28+5:302021-12-21T13:18:30+5:30
MIM MP Imtiaz Jalil: एमआयएमचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल
औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे खा. इम्तियाज जलील ( MIM MP Imtiaz Jalil ) यांच्यावर शनिवारी एका लग्नसमारंभात चक्क नोटांचा वर्षाव करण्यात आला. बुलडाण्याच्या नगराध्यक्षा झेबुन्नीसा यांचे पती तथा स्वीकृत नगरसेवक सज्जादभाई आणि इतर उपस्थितांनी हा नोटवर्षाव केला (another rain of notes on MIM MP Imtiaz Jalil) . सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. खा. जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी एमआयएमच्या ( AIMIM ) कार्यकर्त्यांनीही नोटा उधळल्या होत्या.
एमआयएमचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचे लग्न रविवारी मोठ्या थाटामाटात झाले. लग्नाच्या पूर्वसंध्येला आयोजित विविध (सांचक) कार्यक्रमाला खा. जलील विशेष निमंत्रित होते. सह्याद्री लॉनवरील हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगला. कव्वालीही सुरू झाली. कव्वाल आणि त्यांच्या वादक संचावर पैशांचा वर्षाव सुरू होता. नरवदेवाला भेटण्यासाठी व्यासपीठावर जलील आले. ते पाहून कव्वालाने अधिक उत्साहाने ‘हसीनो की जुल्फ लहराये’...ही कव्वाली सादर केली. व्यासपीठावर उपस्थित बुलडाण्याच्या नगराध्यक्षा झेबुन्नीसा बेगम यांचे पती सज्जादभाई यांनी नोटांचा वर्षाव सुरू केला. कोरोना नियमांकडे पाठ फिरवीत एकानेही मास्क घातला नव्हता.
नोटा उधळणे ही परंपरा...
लग्न, कव्वाली आदी कार्यक्रमांतून नोटा उधळण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. शनिवारी माझ्यावरही नोटा उधळल्या. या नोटा कोण जमा करतं, हेसुद्धा बघायला हवे. कोरोनाच्या लाटेत कव्वाल आणि त्यांचे वादक संच त्रस्त होता. त्यांना आज यानिमित्ताने चार पैसे मिळत आहेत. बुलडाण्याच्या नागरिकांनी पैसे उधळले. यामध्ये मला चुकीचे काहीच वाटत नाही. उलट यानिमित्ताने गरिबांचा फायदा झाला.
- इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम.