बंडखोर आमदार शिरसाटांचे आणखी एक पाऊल; कार्यालयातून उद्धव ठाकरेंचे छायाचित्र हटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 01:32 PM2022-08-03T13:32:03+5:302022-08-03T13:33:08+5:30
कार्यालयातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची तैलचित्रे (छायाचित्रे) काढून टाकल्याने संजय शिरसाट पुन्हा चर्चेत
औरंगाबाद : पहिल्या दिवसांपासून शिंदे गटात असलेले औरंगाबाद मध्य मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या कार्यालयातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे हटवून त्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्रे लावली आहेत. अन्य बंडखोर आमदारांची कार्यालये बंद असल्याने त्यांनीही पक्षप्रमुखांचे छायाचित्र काढले अथवा नाही, हे कळू शकले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या ४० आमदारांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांचा समावेश होता. यात शहरातील आमदार संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल या दोन आमदारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच औरंगाबादेत दोनदिवसीय दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी त्यांचे समर्थक आमदार संदीपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल आणि आ. संजय शिरसाट यांच्या कार्यालयास भेटी दिल्या.
यापैकी आ. शिरसाट हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यावर सडेतोड टीका करीत असतात. आजही त्यांनी त्यांच्या कार्यालयातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची तैलचित्रे (छायाचित्रे) काढून टाकल्याने ते चर्चेत आले. त्यांनी त्यांच्या कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने तैलचित्र जैसे थे ठेवले आणि उद्धव ठाकरेंच्या छायाचित्राच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र लावले.
शहरात कार्यालय असलेल्या आ. संदीपान भुमरे आणि आ. प्रदीप जैस्वाल यांची कार्यालये बंद असल्याने त्यांनीही पक्षप्रमुखांचे छायाचित्रे काढून टाकले अथवा नाही, हे मात्र कळू शकले नाही. शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या जात आहेत.