मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 17:43 IST2023-12-02T17:43:17+5:302023-12-02T17:43:50+5:30
फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील घटना

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने संपवले जीवन
फुलंब्री : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने जीवन संपवल्याची घटना आज सकाळी ८ वाजता तालुक्यातील चिंचोली नकीब येथून पुढे आली आहे. गणेश काकासाहेब जंगले असे मृत तरुणाचे नाव आहे.
चिंचोली नकीब येथील गणेश जंगले ( २७) हा तरुण मजुरीचे काम करत असे. तो मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होता. शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान आई - वडिलांसोबत जेवण केल्यानंतर तो बाजूच्या खोलीत झोपायला गेला. आज सकाळी ८ वाजता वडिलांनी चहा घेण्यासाठी आवाज दिला असता गणेशने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांच्या सहाय्याने दरवाजा तोडला असता आत गणेशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
दरम्यान, गणेशजवळ एक चिठ्ठी सापडली असून त्यात, मराठा समाजाला आरक्षण मिळावे असा उल्लेख आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या प्रकरणी आर्थिक मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला असल्याची माहिती नायब तहसीलदार विलास सोनवणे यांनी दिली आहे.