५९ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:08 AM2017-09-23T01:08:46+5:302017-09-23T01:08:46+5:30
नाफेड हमीभाव केंद्रावरील बहुचर्चित तूर खरेदी घोटाळ्यातील ५९ संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे,
जालना : नाफेड हमीभाव केंद्रावरील बहुचर्चित तूर खरेदी घोटाळ्यातील ५९ संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे, तर एका शेतकºयाचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांनी तूर विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या तूर विक्री घोटाळ्यात सहभागी १८ व्यापारी ४९ शेतकरी व अन्य तिघांवर २ सप्टेंबर रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील ७० संशयितांपैकी ६० जणांनी ३० अर्जांद्वारे जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली होती. या अर्जावरील सुनावणी या पूर्वी दोनदा पुढे ढकलण्यात आली होती.
शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश अनघा रोटे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत ५९ संशयितांचे २९ अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले. तर सुमीत दिनेश पवार या एकमेव शेतकºयाचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील विपुल देशपांडे यांनी काम पाहिले. अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्यामुळे या प्रकरणातील संशयितांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.