ॲंटिजन तपासणी निष्प्रभ; आरटीपीसीआर बेस्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 05:03 PM2021-09-09T17:03:30+5:302021-09-09T17:11:22+5:30
आरोग्य विभागाने मागील काही दिवसांमध्ये तपासण्यांची संख्या कमी केली.
औरंगाबाद : कोरोनाचा ( Corona Virus ) संसर्ग पूर्णपणे कमी झालाय असे आभासी चित्र निर्माण करण्यात आले आहे. शहरात ८० टक्के ॲंटिजन तपासण्या होत आहेत. त्यांचा निकाल ९९ टक्के नकारार्थी आहे. २० टक्के आरटीपीसीआर तपासण्यात होत असून, त्यात १० टक्क्यांहून अधिक रुग्ण बाधित आढळत आहेत.
प्रशासनाकडून ( Aurangabad Municipal Corporation ) आजही फेक ॲंटिजन ( Antigen Test ) तपासण्यांवर भर दिल्या जातोय. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेत संसर्ग अधिक ( Corona Third Wave ) वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या आकडेवारीची सखोल माहिती घेतली असता धक्कादायक चित्र समोर आले. बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासण्या जवळपास बंदच झाल्या आहेत.शहराचा पॉझिटिव्हिटी रेट अत्यंत कमी असल्याचे महापालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आले. आरोग्य विभागाने मागील काही दिवसांमध्ये तपासण्यांची संख्या कमी केली. ॲंटिजन तपासण्यांवर सर्वाधिक भर दिला. नागरिकांनी मागणी केली तरच आरटीपीआर तपासण्या होत आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत. ही दिशाभूल का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
जुलैमधील तपासण्या
जुलै महिन्यात महापालिकेने शहरात ॲंटिजनच्या ३४ हजार ९४२ तपासण्या केल्या. त्यामध्ये शहरातील ४० बाहेरगावचे ९ असे एकूण ४९ बाधित रुग्ण आढळून आले. याच महिन्यात आरटीपीसीआर तपासण्या फक्त १३ हजार ८८ झाल्या. त्यामध्ये बाधित ३८४ आढळले. दोन्ही चाचण्यांचे मिळून एका महिन्यात ४३३ बाधित सापडले.
ऑगस्टमधील तपासण्या
१ ते ३१ ऑगस्टपर्यंत ॲंटिजनच्या ४८ हजार २७ तपासण्या झाल्या. त्यात मनपा हद्दीतील ३० बाहेर आणि गावी राहणारे १९ बाधित आढळले. या महिन्यात आरटीपीसीआर तपासण्या १५ हजार ५३५ केल्या. त्यात तब्बल २४२ बाधित सापडले. या महिन्यातील बाधितांची संख्या २९१ पर्यंत पोहोचली.
बाधितांच्या नातेवाइकांची तपासणी शुन्य
महापालिका हद्दीत एखादा नागरिक कोरोना बाधित आढळल्यावर त्याच्या संपर्कातील हाय रिस्क, लो रिस्क लोकांच्या कोरोना तपासण्या करण्याचे काम मनपाच्या आरोग्य विभागाचे आहे. मागील काही महिन्यांपासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही पद्धतच बंद पडली आहे. ज्या भागात रुग्ण राहतात त्या वॉर्डाच्या मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयातून निरोप देण्यात येतो. वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या नातेवाइकांना जवळील तपासणी केंद्रावर जा तपासण्या करून घ्या, असे सांगतात. एकही नातेवाईक तपासणीसाठी पुढे येत नाही.
आता तपासणी संख्याच घटली
१ सप्टेंबरपासून मनपाने ६१४ कंत्राटी कर्मचारी कमी केले. याचा परिणाम तपासण्यांवर दिसून येतो आहे. ३१ ऑगस्टपूर्वीपर्यंत शहरात दररोज साडेतीन हजार तपासण्या होत होत्या. आता ही संख्या अवघ्या २०० ते ३०० पर्यंत खाली आली. रेल्वेस्टशन, विमानतळ, विविध शासकीय कार्यालये, शहरात दाखल होणारे नागरिक आणि शहरात मोबाइल पथकांकडून तपासण्या करण्यात येतात.