विनाकारण फिरणाऱ्यांची उडाली भंबेरी; पोलिसांनी पकडून रस्त्यावरच केल्या ५२ जणांच्या अँटिजेन चाचण्या, तासाभरात रस्ता झाला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 07:11 PM2021-04-16T19:11:54+5:302021-04-16T19:16:30+5:30
जीवनावश्यक वस्तू व दुकाने लॉकडाऊन मधून वगळण्यात आली आहे. याचाच फायदा घेत काही बेजबाबदार नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत होते.
पैठण : शहरात मोकाट फिरणाऱ्या ५२ जणांना धरून त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यात ३ जण पॉझिटिव्ह आले असून त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. पोलीस, नगर परिषद व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकाने राबविलेल्या सिल्लोड पँटर्नला पैठण शहरात आज अभूतपूर्व असे यश लाभले. दरम्यान, यापुढे सलग अँटिजेन टेस्ट उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले.
शहरातील संभाजी चौकात मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक किशोर पवार, सुदाम वारे, ग्रामीण रूग्णालयाचे लँब पथक आज सकाळपासून ठाण मांडून होते. रस्त्यावर फिरणाऱ्याची चौकशी करून विनाकारण फिरत असल्याचे लक्षात येताच त्याची अँटिजेन टेस्ट घेण्यात येत होती. पैठण नगर परीषद, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक व पोलीस शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्यांची अँटिजेन कोवीड टेस्ट करीत असल्याचे समजताच विनाकारण बाहेर पडलेल्या नागरिकांनी गल्ली बोळातून मार्ग काढत घर जवळ केले. अवघ्या तासभरात रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केला असून जीवनावश्यक वस्तू व दुकाने लॉकडाऊन मधून वगळण्यात आली आहे. याचाच फायदा घेत काही बेजबाबदार नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत होते. बाजारपेठ बंद असतानाही रस्त्यावरील गर्दी कमी झालेली नव्हती. दरम्यान नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी अँटिजेन टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला त्यास ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकाचे प्रपाठक डॉ भारत चव्हाण व पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सहकार्य केले. अँटिजेन टेस्टच्या भितीने रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांना मात्र चाप बसला.