भुकेने व्याकुळ बिबट्याचा अन्य वन्यप्राण्यांसोबतच्या संघर्षात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 11:35 AM2022-06-04T11:35:46+5:302022-06-04T11:40:01+5:30
बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर दौलताबाद नर्सरीत वनविभाग तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या उपस्थितीत इन कॅमेरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
औरंगाबाद : पळशी शामवाडी शिवारात वनविभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी पकडलेला बिबट्या गंभीर जखमी झाल्याने गुरुवारी रात्रीच मृत्युमुखी पडला. हा बिबट्या वन्यप्राण्याच्या संघर्षात अगोदर गंभीर जखमी झालेला होता. त्याच्या अंगावर १० ते १२ गंभीर जखमा तपासणी व शवविच्छेदनात आढळून आल्या. शुक्रवारी दुपारी दौलताबाद नर्सरीत पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वनविभागाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
बिबट्या पळशी शामवाडी शिवारात जखमी किंवा आजारी अवस्थेत असल्याची माहिती मिळाल्यावरून खामगावचे वनरक्षक विजय राठोड, तसेच वनरक्षक पळशीचे वनरक्षक भाऊसाहेब भोसले यांनी ही माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर, सहाय्यक वनसंरक्षक अरुण पाटील यांना व रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी पाठविण्यात आली. बिबट्या जखमी असल्याचे पूर्ण लक्षात आले. त्याच्यावर उपचार करणे गरजेचे आहे, त्याला पकडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांची परवानगी मिळाल्यानंतरच वन्यप्राणी बिबट रेस्क्यू करून पुढील औषधोपचारासाठी दौलताबाद रोपवाटिका येथे पिंजऱ्यात टाकून घेऊन गेले. जखमी असलेला बिबट्याच्या उपचारासाठी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. संजय गायकवाड औरंगाबाद यांच्याशी टीमने संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलाविले होते. त्यांनी पिंजऱ्यात त्याची तपासणी करून उपचार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
उपचारादरम्यान मृत्यू...
इतर वन्यप्राण्यांसोबत झालेल्या झटापटीत बिबट्याचा गळा, बरगडी व अंगावर शिंग लागल्याने तो गंभीर जखमी झाला असावा, उपचारादरम्यान दौलताबाद याठिकाणी डॉ. गायकवाड यांनी तपासून अखेर बिबट्याला मृत घोषित केले, असे मानद सदस्य किशोर पाठक यांनी सांगितले. मृत्यू झाल्यानंतर रात्री त्याचे शवविच्छेदन करण्यात येत नसल्याने रात्रभर येथे कर्मचाऱ्यांना पहारा द्यावा लागला. त्यासाठी शहरातून बर्फाच्या दोन लाद्या आणून त्याचे मृत शरीर त्यावर सुरक्षित ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी पंचायत समिती औरंगाबादचे पशुधन विकास अधिकारी डॉ. भगत, त्यांच्या टीममधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता इंगळे, पशुधन विकास अधिकारी माळीवाडा डॉ. सुरे, वनविभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत (दि.३ ) शुक्रवारी शवविच्छेदन करून येथेच त्याचे दहन करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला असून प्रयोगशाळेत तो पाठविला जाणार आहे.