जगातील कोणताही सिनेमा भावनिकदृष्ट्या मनाला भिडतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:19 AM2019-01-10T00:19:02+5:302019-01-10T00:20:19+5:30
कोणताही चित्रपट महोत्सव आपल्याला घडवतो. कलेला सीमा नसतात. जगातील कोणताही चित्रपट भावनिकदृष्ट्या तुमच्या मनाला भिडतो. हेच या चित्रपट माध्यमाचे यश असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी येथे केले.
औरंगाबाद : कोणताही चित्रपट महोत्सव आपल्याला घडवतो. कलेला सीमा नसतात. जगातील कोणताही चित्रपट भावनिकदृष्ट्या तुमच्या मनाला भिडतो. हेच या चित्रपट माध्यमाचे यश असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी येथे केले.
सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भांडारकर बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली, दिग्दर्शक एन. चंद्रा, निर्माते किरण शांताराम, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री राजश्री देशपांडे, युरोपीय अभिनेत्री मारियान बोर्गे, लेखक दासू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी, भांडारकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या आंतरराष्ट्रीय महोत्सवाची टाळ्यांचा गजरात सुरुवात झाली. भांडारकर म्हणाले की, देश-विदेशातील ४० चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. ही चित्रपट रसिकांसाठी पर्वणी होय. यातील काही भाषा रसिकांना समजणार नाही; पण चित्रावरून व त्यातील कलाकारांचे हावभाव यावरून त्या चित्रपटाची कथानक लक्षात येते व त्यातील संदेश रसिकांच्या मनाला भिडतोच. मात्र, आता बदलत्या तंत्रज्ञानानुसार आता चित्रपट क्षेत्राने बदलणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक करीत अशा आयोजनांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे आवश्यक असल्याचे, एन. चंद्रा यांनी नमूद केले. दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर कमी व्हावे. असे मत किरण शांताराम यांनी मांडले. मराठी चित्रपटांचा स्वतंत्र सशुल्क महोत्सव भरवावा, अशी सूचना चंद्रकांत कुलकर्णी यांनी केली. यावेळी मान्यवरांचे स्वागत संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी केले. यावेळी नीलेश राऊत, सचिन मुळे, प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद आदींची उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘कोल्ड वॉर’ (पोलंड) हा चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात झाली. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा चित्रपटात प्रभावीपणे दाखविण्यात आली. या महोत्सवात प्रोझोन मॉल आयनॉक्स येथे १३ जानेवारीपर्यंत दररोज चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
चौकट
गिरी कासारवल्ली यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार
चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध दिग्दर्शक गिरी कासारवल्ली यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यास उत्तर देताना कासारवल्ली म्हणाले की, माझ्या चित्रपट कारकीर्दीच्या चाळीसाव्या वर्षात मिळालेल्या या पुरस्काराने इतर सर्व पुरस्कारांच्या तुलनेने अधिक आनंद झाला आहे. मानवी मनाच्या विकासात चित्रपट प्रभावी माध्यम आहे. मराठी चित्रपटाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.