कोणीही या, अवघ्या ४०० रुपयांत ॲम्ब्युलन्सचा हॉर्न; चित्रविचित्र आवाजाच्या हॉर्नचीही मागणी
By प्रशांत तेलवाडकर | Published: February 8, 2024 11:20 AM2024-02-08T11:20:40+5:302024-02-08T11:25:01+5:30
अधिकृत ऑटोमोबाइलच्या शोरूममध्येच असे हॉर्न विकणे अपेक्षित आहे.
छत्रपती संभाजीनगर : वाहन चालवत असताना कधी पाठीमागून ॲम्ब्युलन्स किंवा सायरनच्या हॉर्नचा आवाज येतो आणि सर्व वाहने त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग रिकामा करून देतात... मात्र, कधी असेही होते की, पाठीमागून सायरनचा हॉर्न वाजतो तुम्ही बाजूला सरकता आणि एक दुचाकीस्वार युवक धूम स्टाईल कट मारून पुढे निघून जातो... सायरन असो वा ॲम्ब्युलन्सचा हॉर्न, असे कोणालाही बसविता येत नाहीत. त्याचेही नियम आहेत. मात्र, आजघडीला बाजारात अवघ्या २०० ते ४०० रुपयांत हे हॉर्न सहज मिळतात.
कोणालाही विकले जातात हे हॉर्न
अधिकृत ऑटोमोबाइलच्या शोरूममध्येच असे हॉर्न विकणे अपेक्षित आहे. ज्यांनी हे हॉर्न नेले; त्यांचे नाव, मोबाइल नंबर, पत्ताही विक्रेत्याने रजिस्टरवर लिहिणे अपेक्षित आहे. पण गल्लीबोळातील दुकानात असे हॉर्न सहज मिळतात. त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे.
कोणत्या देशातून येतात फॅन्सी हॉर्न?
चीन देशातून हे हॉर्न येत असून. त्यास चायनीज हॉर्न (फॅन्सी हॉर्न) म्हणून ओळखले जातात. दुचाकीला लावण्यासाठी लहान आकारात हे हॉर्न उपलब्ध आहेत. फॅन्सी हॉर्न नावाने हे विकले जातात.
कुठे मिळतात फॅन्सी हॉर्न ?
शहरातील शहागंज, जकात नाका रोड, नारेगाव या भागांत फॅन्सी हॉर्न विकले जातात. काही दुकाने रस्त्यावर तर काही गल्लीबोळात आहेत.
लहान मुलाच्या रडण्यापासून ते डुकराच्या आवाजापर्यंत
फॅन्सी हॉर्नमध्ये लहान मुलाच्या रडण्याचा आवाज, डुकराच्या आवाजाचे हॉर्नही उपलब्ध आहेत. टवाळखोर तरुणांनी असे हॉर्न दुचाकीला बसविले आहेत. अचानक डुकराचा आवाज किंवा बाळ रडण्याचा आवाज ऐकल्यावर समोरील वाहनधारक दचकल्याने अपघातही होतात.
८० डेसिबलपेक्षा कमी आवाज असावा
कायद्यानुसार वाहनांच्या हॉर्नचा आवाज ८० डेसिबलपेक्षा कमी असावा, मात्र, शहरात काही वाहनांना असे विचित्र आवाजातील हॉर्न बसविले आहेत की, ते १२० डेसिबलपर्यंत त्याचा आवाज निघतो. ध्वनिप्रदूषण वाढते.
६०० दुचाकीस्वारांवर कारवाई
वाहनांमध्ये कंपनीच्या व्यतिरिक्त बदल करणे बेकायदा आहे. कार असो वा दुचाकीला उत्पादक कंपनीने जो हॉर्न दिलेला आहे, तो काढून कर्कश आवाजातील हॉर्न बसविणे ही गंभीर बाबा आहे. वाहतूक पोलिसांकडून आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. खासकरून तरुणांच्या दुचाकीवर आमचे लक्ष आहे.
- अशोक थोरात, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग
आम्ही ॲम्ब्युलन्ससाठीच हॉर्न विकतो
आम्ही ॲम्ब्युलन्ससाठी हॉर्न विकतो. दुकानाबाहेर हॉर्न घेऊन गेल्यावर ग्राहक तो अन्य वाहनाला लावत असतील तर ती आमची चूक नाही.- फॅन्सी हॉर्न विक्रेता