फुकटच्या पैशांसाठी काहीही, लाडकी बहीण योजनेत महिलेचे फोटो लावून १२ भावांनी केले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 05:55 PM2024-09-13T17:55:18+5:302024-09-13T17:58:04+5:30
कन्नड तालुक्यातील प्रकार; अधिकाऱ्यांनी अर्ज रद्द करून कारवाईची केली शिफारस
कन्नड ( छत्रपती संभाजीनगर) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळावा, यासाठी कन्नड तालुक्यातील १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वत:चा अर्ज भरल्याची बाब महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आली असून याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी नीलेश राठोड यांनी दिली.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत ९२ हजार ९८ अर्ज भरण्यात आले असून त्यातील ९० हजार ९५७ मंजूर करण्यात आले आहेत, तसेच तांत्रिक कारणाने ४२८ अर्ज अपात्र करण्यात आले आहेत, तर ३५७ रद्द केले आहेत. दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या स्वीकृतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या अर्जांची या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ३० ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता भलतेच प्रकार समोर आले. तालुक्यातील १२ जणांनी स्वत:च्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केले. आधार कार्डही स्वत:च्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वत:च्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने पडताळणी केल्यानंतर ही बाब निदर्शनास आले. संबंधित कर्मचाऱ्यांनी ही माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी नीलेश राठोड यांना दिली. त्यानंतर राठोड यांनीही याबाबत पडताळणी केली, असता त्यात तथ्य आढळले. त्यानंतर त्यांनी हे सर्व १२ अर्ज रद्द केले. त्यानंतर या १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव १० सप्टेंबर रोजी वरिष्ठांना सादर केला. याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल, असे बालविकास प्रकल्प अधिकारी नीलेश राठोड यांनी सांगितले.
फुकटच्या पैशांसाठी काहीही
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना पात्र महिला लाभार्थ्यांसाठी असली तर पोर्टलवर या योजनेच्या लाभासाठी दाखल झालेले अर्ज तातडीने मंजूर होत असल्याचे आपले अर्जही त्वरित मंजूर होतील व दरमहा आपणासही फुकटात दीड हजार रुपये मिळतील, असे समजून या १२ पुरुषांनी अर्ज दाखल केले; परंतु महिला व बालविकास प्रकल्प विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख कर्तव्य बजावत बहिणीच्या योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या भावांना उघडे पाडले. आता प्रशासन अशा फसव्या भावांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.