बिबट्याचे पिल्लांसह दर्शन झाल्याने आपेगाव परिसर पुन्हा दहशतीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:06 AM2020-12-29T04:06:21+5:302020-12-29T04:06:21+5:30
पैठण : पिता-पुत्राची शिकार केल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून आपेगाव शिवारात नरभक्षक बिबट्याची दहशत कायम आहे. गेल्या दोन दिवसांत पुन्हा ...
पैठण : पिता-पुत्राची शिकार केल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून आपेगाव शिवारात नरभक्षक बिबट्याची दहशत कायम आहे. गेल्या दोन दिवसांत पुन्हा मादी बिबट्याचे पिल्लांसह दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थांची पाचावर धारण बसली आहे. एकीकडे, वनखाते बिबट्यास जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने जास्तीची कुमक मागवून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक प्रल्हाद औटे यांना शनिवारी मायगाव शिवारात चारीजवळील रस्त्यावर बिबट्या आडवा गेला. यावेळी बिबट्यासोबत दोन पिल्ले होती, असे त्यांनी सांगितले. सोमवारी गोपेवाडी शिवारात गायकवाड यांच्या शेतातून नायगाव पायवाटेने जाताना बिबट्यास विलास खरात व राजू राजगुरू या तरुणांनी पाहिले. वनरक्षक राजू जाधव यांनी माहिती मिळताच गोपेवाडी शिवारात जाऊन बिबट्याचा माग घेतला. मात्र, तो आढळला नाही. दरम्यान, सोमवारी वनखात्याने बिबट्याचा वावर असलेल्या गोपेवाडी शिवारात आणखी एक पिंजरा लावला आहे. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनखात्याने यंत्रणा वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका संपर्कप्रमुख दत्ता गोर्डे यांनी केली आहे.
चौकट
बिबट्या ना कॅमेऱ्यात, ना पिंजऱ्यात
गेल्या दीड महिन्यांपासून पैठण तालुक्यातील नरभक्षक बिबट्याच्या मागावर असलेल्या वनखात्याच्या अधिकाऱ्यांना बिबट्यास पिंजऱ्यात बंद करण्यात अद्याप यश आलेले नाही. बिबट्याच्या दहशतीने गोदाकाठ परिसरात शेतीची कामे प्रभावीत झाली असून शेतकऱ्यांनी बिबट्याची धास्ती घेतली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याने वनरक्षकांचे पथक तालुक्यात तैनात केले आहे. आपेगाव येथे पिंजरा लावण्यात आला आहे. याशिवाय परिसरात अन्य ठिकाणी ४ पिंजरे ठेवण्यात आले आहेत. वाघाडी, आपेगाव, नायगाव शिवारात ५ ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. मात्र, बिबट्याची छबी ना ट्रॅप कॅमेऱ्याने टिपली ना तो पिंजऱ्यात अडकला.
चौकट
शेतकरी जीव मुठीत धरुन करतात काम
आपेगाव येथील अशोक औटे व त्यांचा मुलगा कृष्णा या पिता-पुत्रांचा त्यांच्याच शेतात १६ नोहेंबर रोजी बिबट्याने फडशा पाडल्यानंतर परिसरातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. जीव मुठीत धरून काम करीत आहेत. नरभक्षक बिबट्याच्या दहशतीने गोदाकाठचा शेतशिवार दुपारीच निर्मनुष्य दिसत आहे.