स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सहा उमेदवारांचे अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 02:30 PM2019-08-03T14:30:08+5:302019-08-03T14:34:11+5:30
तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता
औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मैदानात सात जणांनी उमेदवारी अर्ज १ आॅगस्ट रोजी दाखल केले होते. अर्जांची शुक्रवारी छाननी केली असता विशाल नांदरकर यांचा अर्ज कागदपत्रांअभावी बाद ठरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आता वैध सहा अर्जांपैकी माघार कोण घेणार, याकडे लक्ष लागले आहे. किमान तीन उमेदवार माघार घेणार असल्याची चर्चा आहे. तसे झाले तर तिरंगी आणि दोन उमेदवारांनी माघार घेतली तर चौरंगी लढत होण्याचे संकेत आहेत. ५ आॅगस्ट उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. १९ आॅगस्ट रोजी मतदान होईल. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल.
निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. यामध्ये महायुतीकडून अंबादास दानवे, आघाडीचे बाबूराव ऊर्फ भवानीदास कुलकर्णी, नंदकिशोर सहारे, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद शेख, तात्यासाहेब चिमणे, शहानवाज अब्दुल रहेमान खान यांचे अर्ज वैध ठरले आहेत. सहायक निवडणूक अधिकारी संजीव जाधवर यांच्याकडे अर्जांची छाननी करण्यात आली.
दोन अपक्ष आणि दोन पक्षाचे उमेदवार अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता या मतदारसंघात सध्यातरी आहे. चौरंगी लढत झाल्यास युतीच्या उमेदवाराला फोडाफोडीच्या राजकारणाचा सामना करावा लागेल. शिवाय दानवे यांना अनपेक्षितरीत्या उमेदवारी मिळाल्यामुळे
शिवसेनेतील इतर इच्छुक आणि पक्षातील नेत्यांची मने दुखावली आहेत. त्याअंतर्गत राजकारणाचा परिणाम काय होणार, हे आताच सांगणे अवघड आहे. निवडणुकीत भाजपसह ६५७ मतदार सर्व मिळून आहेत. त्यामध्ये भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १७०, राष्ट्रवादी काँग्रेस ८०, एमआयएम २८, रिपाइं, बसपा व इतर पक्ष, अपक्ष मिळून ४९ असे मतदार आहेत.
विधान परिषदेसाठी काँग्रेस आघाडीचे कुलकर्णी आणि महायुतीचे दानवे झाले आमने-सामने https://t.co/Yi22kktl7B
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 2, 2019
भाजप नगरसेवकांना आला ‘भाव’
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. १८९ च्या आसपास भाजपचे नगरसेवक मतदार आहेत. त्यामुळे भाजपचे नगरसेवकच किंगमेकर ठरणार आहेत. २०१३ साली झालेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक किंगमेकर ठरले होते. त्यावेळी युतीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांचा पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजप नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भाजपच्या मतदारांना सध्या ‘भाव’ आला आहे.
शिवसेनेला धास्ती मतं फुटीची; मतदारांसाठी ‘व्हीप’ बजावणार
अंदाजे पक्षीय बलाबल
पक्ष मतदार
भाजप १८९
शिवसेना १४१
काँग्रेस १७०
राष्ट्रवादी काँग्रेस ०८०
एमआयएम ०२८
रिपाइं, बसपा, अपक्ष ०४९
एकूण ६५७
राजकीय समीकरणनिहाय मतदान
महायुती ३३०
महाआघाडी २५०
एमआयएम-अपक्ष ०७७
एकूण ६५७