पराभूत उमेदवारांकडून 'ईव्हीएम' तपासणीसाठी आले अर्ज; जाणून घ्या तपासणी प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 03:39 PM2024-12-03T15:39:53+5:302024-12-03T15:41:08+5:30
मॉक पोलसारखीच असेल प्रक्रिया, जाणून घ्या कशी करणार ईव्हीएम मशीनची तपासणी
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चार उमेदवारांनी १२ ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याच्या मागणीसाठी ५ लाख ६६ हजार ४०० रुपये निवडणूक विभागाकडे जमा केले आहेत. जिल्हा प्रशासनाने सोमवारी याबाबतची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविली आहे. नवीन वर्षांत म्हणजेच जानेवारी २०२५ मध्ये ईव्हीएम तपासणीची तारीख निश्चित होणे शक्य आहे. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या उमेदवारांच्या समोर मतदान, मतमोजणीची प्रक्रिया घेतली जाईल.
निवडणुकीत पराभूत झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारास एकूण मतदान केंद्रांपैकी पाच टक्के केंद्रांच्या ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी करता येते. त्यानुसार सहा जणांनी ईव्हीएम मशीन तपासणीची मागणी केली होती. त्यातील दोघांचे अर्ज फेटाळले तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी ६ मशीनसाठी २ लाख ८३ हजार रुपये भरले. औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात आणि एमआयएमचे नासेर सिद्दीकी व वैजापूरचे डॉ. दिनेश परदेशी यांनी २ मशीनच्या पडताळणीसाठी ९४ हजार ४०० रुपये भरले.
मॉक पोलसारखीच असेल प्रक्रिया
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, भेल (भारत इलेक्ट्राॅनिक लि.) च्या अभियंत्यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी मागणी केलेल्या मतदान केंद्राच्या ईव्हीएम मशीन गोदामातून बाहेर आणल्या जातील. मशीनमधील सर्व जुना डेटा डिलीट करण्यात येईल. बॅलेट युनिटवर डमी मतपत्रिका चिटकविण्यात येईल. त्यानंतर मॉकपोलसारखीच मतदान प्रक्रिया राबविण्यात येते. प्रत्येक मशीनवर १४०० मतदान केले जाते. केलेल्या मतदानाची नोंद ठेवली जाते. त्यानंतर मतमोजणी प्रक्रियेप्रमाणेच मोजणी होते. उमेदवारांना टाकलेले मत मशीनमध्ये नोंदविले की नाही, हे तपासण्यात येते. शेवटी व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांचीही मोजणी करण्यात येते. उमेदवारांना प्रत्यक्ष निवडणुकीत पडलेल्या मतांची, व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची तपासणी होत नाही.