श्रुती भागवतप्रकरणी ‘एसआयटी’ नियुक्त
By Admin | Published: August 20, 2016 01:09 AM2016-08-20T01:09:14+5:302016-08-20T01:19:31+5:30
औरंगाबाद : उल्कानगरी येथील श्रुती भागवत यांचा खून होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
औरंगाबाद : उल्कानगरी येथील श्रुती भागवत यांचा खून होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. श्रुती भागवत यांच्या खुनाचा तपास सीआयडी अथवा सीबीआयकडे द्यावा, यासाठी शहरातील विविध महिला संघटनांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे.
उल्कानगरी येथील श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रुती विजय भागवत (४६) या शिक्षिकेची १८ एप्रिल २०१२ रोजी रात्री त्यांच्या फ्लॅटमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्यांचे प्रेत गादीमध्ये गुंडाळून ती गादी पेटवून दिली होती. पेटलेल्या गादीच्या धुराचे लोट अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या अन्य शेजाऱ्यांच्या घरात गेल्यानंतर ते झोपेतून जागे झाले. भागवत यांच्या घरात आग लागली असावी, या शंकेने त्यांनी त्यांच्या घरात डोकावून पाहिले असता खुनाची घटना उघडकीस आली. घटनेच्या दिवशी श्रुती यांचे पती विदेशात तर मुलगा शिक्षणानिमित्त पुणे येथे होता. शांत आणि उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्कानगरीत झालेल्या या हत्येने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.
तत्कालीन पोलीस आयुक्त संजीवकुमार यांनी युद्धपातळीवर तपास केला. मात्र मारेकऱ्यापर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही. २०१२ साली महिला संघटनांनी आंदोलने केली होती. तपास सीआयडी अथवा सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र शासनाने तपास एसआयटीकडून करण्याचा निर्णय घेतला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच एसआयटी स्थापन केली आहे. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, महिला पोलीस उपनिरीक्षक भांगे आणि चार कर्मचाऱ्यांचे हे पथक आहे.
ह्यएसआयटीमार्फत तपास सुरू
उपायुक्त आटोळे म्हणाले की, शासनाच्या आदेशाने नुकतीच श्रुती भागवत यांच्या खुनाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीने तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेचा उलगडा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.