सदस्यांची नियुक्ती सुरु; तीन महिन्यात वक्फ बोर्ड अस्तित्वात येणार : नलाब मलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:13 PM2021-02-16T12:13:42+5:302021-02-16T12:43:09+5:30
जिल्हास्तरावर वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे.
औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी सीईओ नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वक्फमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
मलिक यांनी सोमवारी सकाळी सुभेदारी विश्रामगृहात वक्फ बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील वार्षिक योजनेच्या बैठकीसाठी निघून गेले. दुपारी मोजक्याच पत्रकारांसोबत बोलताना ते पुढे म्हणाले की, आज बोर्डाचा संक्षिप्त आढावा घेतला. बोर्डातील रेकॉर्ड अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने ते डिजिटल पद्धतीने सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्मचारी भरतीसाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. १४० कर्मचारी भरतीसाठी शासने मंजुरी दिलेली आहे. येत्या काही दिवसांत थोडे- थोडे करून ही भरती करण्यात येईल. जिल्हास्तरावर वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या जागांबाबत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या विषयावर मलिक यांनी सांगितले की, इम्तियाज जलील आता बोर्डाचा एक भाग आहेत. बोर्डाचे उत्पन्न वाढविणे हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. भाडे वाढवून न देणाऱ्या मंडळींवर कारवाई करायला हवी. एखादी मालमत्ता लीजवर देत असताना नियमांचे पालन झालेच पाहिजे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ बंद असल्याबाबत पत्रकारांनी त्यांना छेडले असता मलिक म्हणाले की, महामंडळातर्फे यापूर्वी काही नागरिकांना कर्ज देण्यात आले होते. त्याची परतफेड आजपर्यंत झालेली नाही.