नीता पाडळकर यांच्या जागी गजानन सानप यांची नियुक्ती
By योगेश पायघन | Updated: February 27, 2023 20:57 IST2023-02-27T20:57:33+5:302023-02-27T20:57:39+5:30
व्यवस्थापन परिषद हे अधिकार मंडळ महत्त्वाचे मानले जाते.

नीता पाडळकर यांच्या जागी गजानन सानप यांची नियुक्ती
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य डाॅ. नीता पाडळकर यांच्या जागी विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डाॅ. गजानन सानप यांची राज्यपाल रमेश बैस यांनी नियुक्ती केली.
व्यवस्थापन परिषद हे अधिकार मंडळ महत्त्वाचे मानले जाते. या मंडळावर राज्यपाल नियुक्त २ सदस्य निवडले जातात. राज्यपाल नियुक्त सदस्य होण्यासाठी विद्यापीठ विकास मंचकडून गजानन सानप यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटाकडून विजय सुबुकडे यांच्यासह भाजपच्या गोटातून अनेकांनी फिल्डिंग लावली होती.
मात्र तत्कालीन राज्यपालांनी अनपेक्षित असलेली नावे डाॅ. नीता जयंत पाडळकर आणि डाॅ. काशीनाथ देवधर यांची नियुक्ती करून विद्यापीठ राजकारणात सक्रिय असलेल्यांना मोठा धक्का दिला होता. सानप यांच्या नियुक्तीनंतर डाॅ. नीता पाडळकर म्हणाल्या, मी काम करू इच्छित नसल्याचे राजभवनाला कळवले होते. नव्या राज्यपालांनी सूत्रे हाती घेताच सोमवारी नियुक्ती जाहीर झाली. सानप यांची नियुक्ती केल्याचे पत्र मिळाल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.