विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर नऊ सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती
By राम शिनगारे | Published: July 15, 2023 07:24 PM2023-07-15T19:24:37+5:302023-07-15T19:25:00+5:30
आठ प्राचार्यांचा समावेश : एक जागा रिक्तच, इतर प्रवर्गातील आठ नियुक्त्यांची प्रतीक्षा
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी नऊ सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये आठ प्राचार्य आणि विद्यापीठातील एका शिक्षकाचा समावेश आहे. महाविद्यालयातील एका शिक्षकाची नियुक्ती मात्र करण्यात आलेली नाही. त्याशिवाय तज्ज्ञ सात व्यक्तीच्या नियुक्त्यांचीही अद्याप प्रतीक्षाच आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अंतर्गत कलम ३२ (३) (एफ) अन्वये राज्यपाल तथा कुलपती विद्या परिषदेवर आठ प्राचार्यांची नियुक्त करतात. त्याच वेळी विद्यापीठ शिक्षक व महाविद्यालयीन शिक्षक प्रवर्गातून प्रत्येकी एक सदस्याची नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार कुलपतींतर्फे सदर नियुक्ती करण्यात आल्याचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना मंगळवारी कळविले. यामध्ये विद्यापीठ शिक्षक प्रवर्गातून रसायनशास्त्राच्या प्रा. डॉ. अंजली राजभोज यांची नियुक्ती केली; तर आठ प्राचार्यांमध्ये कळंब येथील ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, एमआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष भोसले, मत्सोदरीचे प्राचार्य डॉ. भगवानसिंग बैनाडे, घनसावंगी येथभल संत रामदास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र परदेशी, जालना येथील जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. पाटील, देवगाव रंगारी येथील आसाराम भांडवलदार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव, पाटोदा येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे यांचा समावेश आहे. महाविद्यालयील शिक्षक गटातील एकाची नियुक्ती होऊ शकली नाही. त्यामुळे ती जागा रिक्तच राहिली आहे. या नवीनयुक्त सदस्यांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी स्वागत केले आहे.
सात मान्यवर तज्ज्ञांच्या नियुक्तीची प्रतीक्षा
कुलपतींकडून नऊ सदस्यांची विद्यापरिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. सात मान्यवर तज्ज्ञांच्या नियुक्तीची विद्यापीठाला प्रतीक्षा आहे. या नियुक्त्या झाल्यानंतरच विद्यापरिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर पाठवायच्या दोन सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू