यूएस वाणिज्य दूतावासाकडून विद्यापीठाचे कौतुक विद्यार्थी, प्राध्यापकांसोबत साधला संवाद
By विजय सरवदे | Published: April 18, 2023 09:21 PM2023-04-18T21:21:44+5:302023-04-18T21:22:01+5:30
मंगळवारी यूएस वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाला भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण व संशोधनासाठी येणारे बहुतांशी विद्यार्थी पहिल्या पिढीचे पदवीधर असून, या विद्यापीठाचे शैक्षणिक पर्यावरण अत्यंत उत्तम असल्याचे गौरवोद्गार मुंबई येथील यूएस वाणिज्य दूतावास माईक हँकी यांनी काढले.
मंगळवारी यूएस वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाला भेट दिली. या शिष्टमंडळासोबत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. प्रशांत अमृतकर, फॉरेन स्टुडंट्स सेल संचालक डॉ. विकास कुमार, इंटरनॅशनल रिलेशन्स सेंटरच्या संचालक डॉ. बीना सेंगर, ‘इनोव्हेशन सेंटर’चे संचालक डॉ. सचिन देशमुख, परीक्षा मंडळ संचालक डॉ. भारती गवळी, ‘आयपीआर सेल’चे संचालक डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. मुस्तजिब खान व विभागप्रमुखांनी संवाद साधला.
भारतीय विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या संख्येने येतात. देशात सर्वाधिक फेलोशिप प्राप्त विद्यार्थी संख्या आपल्या विद्यापीठात आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. यानंतर यूएस दूतावासच्या शिष्टमंडळाने सिफार्ट सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठाच्या प्रगतीचे सादरीकरण डॉ. सचिन देशमुख यांनी केले. उभय संस्थांच्या कार्याबद्दलची माहिती यावेळी आदानप्रदान करण्यात आली.