‘दलित वस्ती’च्या ३६० कामांना मंजुरी
By Admin | Published: December 30, 2014 12:56 AM2014-12-30T00:56:44+5:302014-12-30T01:18:10+5:30
औरंगाबाद : दोन वर्षांपासून रखडलेल्या दलित वस्ती सुधार योजनेत प्रस्ताव दाखल केलेल्या ३६० ग्रामपंचायतींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली
औरंगाबाद : दोन वर्षांपासून रखडलेल्या दलित वस्ती सुधार योजनेत प्रस्ताव दाखल केलेल्या ३६० ग्रामपंचायतींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मंजूर कामांचा खर्च १४ कोटी १६ लाख ७७ हजार रुपये असून, अद्याप ८ कोटी रुपये शिल्लक पडून आहेत, अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी समाधान इंगळे यांनी दिली.
ही योजना लवकर मार्गी लावण्यासाठी समाजकल्याण समितीने सर्वच प्रस्तावांना तडकाफडकी मंजुरी दिली होती. त्यातील सदोष व निकषात न बसणारे ५७ प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे परत पाठवून, त्यातील त्रुटी दूर करून संपूर्ण निकषात बसणारे प्रस्ताव सादर करण्याचे सांगण्यात आल्याचे इंगळे यांनी सांगितले.
बृहत आराखड्यानुसार २०१३-१४ मध्ये जिल्हा परिषदेला ५३० प्रस्ताव सादर झाले होते. त्यातील ३६० प्रस्ताव मंजूर करून त्या कामाच्या प्रशासकीय मुंजऱ्या देऊन निधी पंचायत समित्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. सदोष ५७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असले तरी त्यातील त्रुटी दूर झाल्याशिवाय त्यांना प्रशासकीय मंजुरी दिली जाणार नाही. ही सर्व कामे ३ ते ७ लाख रुपये खर्चाची आहेत.
२८ आॅगस्ट २०१४ रोजी झालेल्या बैठकीत १६ पंचायत समित्यांना समाजमंदिर व रस्ते दुरुस्तीसाठी प्रत्येकी ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सरकारच्या यादीत नसलेल्या कामांची मागणी करणारे ८७ प्रस्ताव अद्यापही पडून आहेत, असे इंगळे यांनी सांगितले.