मनपाच्या सर्वसाधारण सभेत मिळाली सर्व विषयांना मंजुरी
By Admin | Published: January 31, 2017 12:08 AM2017-01-31T00:08:26+5:302017-01-31T00:11:27+5:30
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. दुपारी ३.३० वाजता सुरू झालेली ही सर्वसाधारण सभा उशिरापर्यंत चालल्याने बहुतांश महिला सदस्यांनी सभेतून काढता पाय घेतला. महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने कदाचित ही शेवटची सर्वसाधारण सभा असल्याचे सांगण्यात येत आहे.
महापौर अॅड. दीपक सूळ यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. यावेळी आयुक्त रमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दलित वस्ती योजनेंतर्गत रद्द केलेल्या कामांचा फेरप्रस्ताव सादर करून सदस्यांनी सुचविलेल्या कामाच्या नावात व ठिकाणांत बदल करण्यास मंजुरी देण्यात आली.
मनपा हद्दीत असलेल्या माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्यासाठी माजी सैनिक संघटनेकडून आलेल्या अर्जावर चर्चा करण्यात आली. उपनिबंधक जन्म-मृत्यू म्हणून सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्याबाबत मंजुरी देण्यात आली. लातूर श्रमिक पत्रकार संघाच्या मीडिया सेंटर, शहरात विविध ठिकाणी सेवाभावी संस्थेमार्फत ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुलभ शौचालय बांधण्यासाठी जागा देण्याबाबतही मंजुरी देण्यात आली. शादीखाना, ईदगाह मैदानासाठी अतिरिक्त जागा खरेदी, अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधणे, नवबौद्ध बांधवांसाठी विपश्यना सेंटरसाठी जागा खरेदी करण्यासाठीही मंजुरी देण्यात आली.
याशिवाय, पं. दीनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत बेघरांना घरे बांधण्यासाठी जागा निश्चित करण्यासही मंजुरी दिली. ही बैठक उशिरापर्यंत चालल्याने बहुतांश महिला सदस्यांनी बैठक संपण्यापूर्वीच सभागृह सोडले. (प्रतिनिधी)