गंगापूर बाजार समितीच्या पेट्रोलपंप उभारणीला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:05 AM2021-07-08T04:05:07+5:302021-07-08T04:05:07+5:30
गंगापूर : येथील बाजार समितीचा स्वतःचा पेट्रोल पंप उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला अखेर यश आले आहे. त्याबाबत पणन ...
गंगापूर : येथील बाजार समितीचा स्वतःचा पेट्रोल पंप उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला अखेर यश आले आहे. त्याबाबत पणन मंडळाने हिरवा कंदील दिला असून यामुळे बाजार समितीच्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत अधिक बळकट होणार आहे.
बाजार समितीच्या आवारात दररोज मोठ्या प्रमाणात शेती मालाची आवक होते. समितीचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल यासाठी समिती प्रयत्नशील होती. त्याचाच एक भाग म्हणून पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१५-१६ मध्ये पंपासंदर्भात पणन मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू झाली असून बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारील भागात पंप सुरू करण्यात येणार आहे. अर्ध्या एकर क्षेत्रात हा पंप उभा राहणार असून एचपी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच जागेची पाहणी करून जागेला पसंती दिली.
पोलीस, नगरपालिकेसह अन्य विभागांचे ना हरकत प्रमाणपत्रासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे. दिवाळीपर्यंत पंप सुरू करण्याचा बाजार समितीचा मानस आहे. बाजार समिती आवारात दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. यासह वैजापूर रोडवरील वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच शहरातील हा सर्वात जवळचा पंप म्हणून वाहनधारकांना सोयीस्कर ठरणार आहे. सीएनजी पंपासाठी देखील प्रस्ताव पाठवला असून त्यास मान्यता मिळाल्यास नाशिक औरंगाबाद महामार्गावरील अनेक वाहनधारकांना फायदा होणार आहे.
---
अडत दुकानदारांचा आक्षेप
ज्या ठिकाणी पंप उभारण्यात येणार आहे. तिथे असलेल्या व्यापाऱ्यांना समितीने गाळे खाली करण्यास सांगितले. त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कळवले. मात्र गाळाधारक व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला असून सध्या असलेल्या जागेवर आम्ही स्वखर्चाने संरक्षक भिंती उभारल्या आहेत. शिवाय आमच्याकडून देखील समितीला उत्पन्न मिळत आहे. पर्यायी जागा सुरक्षित नसून अतिक्रमण असलेल्या समिती प्रवेशद्वाराच्या पूर्वेला सदरील पंप उभारावा अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.