सव्वासात कोटींच्या कामांना मंजुरी

By Admin | Published: April 24, 2016 11:44 PM2016-04-24T23:44:48+5:302016-04-24T23:48:15+5:30

परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने विंधन विहीर घेणे, नळयोजनांची दुरुस्ती आणि तात्पुरत्या नळयोजनांच्या ३५५ कामांना मंजुरी दिली आहे.

Approval of crores of works | सव्वासात कोटींच्या कामांना मंजुरी

सव्वासात कोटींच्या कामांना मंजुरी

googlenewsNext

परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने विंधन विहीर घेणे, नळयोजनांची दुरुस्ती आणि तात्पुरत्या नळयोजनांच्या ३५५ कामांना मंजुरी दिली आहे. सुमारे ७ कोटी २१ लाख रुपयांची ही कामे असून यापैकी केवळ दीडशे कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. टंचाई निवारणाची कामे संथगतीने होत असल्याने जिल्ह्यातील पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे.
परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यापासूनच ग्रामस्थांना पाणीटंचाईने ग्रासले असल्याने पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. जिल्ह्यातील नदी-नाले मागील वर्षीच्या पावसाळ्यापासून पाण्याने वाहिलेच नाहीत. प्रमुख प्रकल्प कोरडे पडले आहेत. जिल्ह्याची भूजल पातळी प्रथमच तीन मीटरने खोल गेली आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर प्राधान्याने उपाय करणे गरजेचे झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार करुन विविध कामांना तातडीने मंजुरी दिली असली तरी ही कामे मात्र जिल्ह्यात संथगतीने सुरु आहेत. आतापर्यंत टंचाईवर मात करण्यासाठी नवीन विंधन विहिरी घेतल्या जात आहेत. जिल्ह्यात १११ विंधन विहिरींना मंजुरी दिली असून त्यापैकी ६० कामे पूर्ण झाली आहेत. ४९ लाख ५० हजार रुपयांचा खर्च या कामावर केला जात आहे. काही गावांमध्ये नळ योजनांची दुरुस्ती झाल्यास तेथील पाणीटंचाई दूर होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ५ कोटी ८८ लाख ३५ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. एकूण २२७ कामे मंजूर केली असली तरी केवळ ९७ कामे पूर्ण झाली असून ९६ कामे रखडली आहेत.
तात्पुरती पूरक नळयोजनेची १७ कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ ७ पूर्ण झाली असून १० कामे अजूनही प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जात आहे. तात्पुरत्या पूरक नळ योजनांच्या कामावर आतापर्यंत ८३ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणाच्या कामांना मंजुरी दिली असली तरी ही कामे तातडीने सुरु केली जात नाहीत. अनेक कामे रखडली आहेत. प्रशासकीय मंजुरीनंतर प्रत्यक्षात काम सुरू होण्यास विलंब लागत आहे. जिल्ह्यातील टंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कामे ग्रामीण भागातील ही कामे तातडीने पूर्ण करावित, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Approval of crores of works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.