बोगद्याच्या कामाला १५ एप्रिलची ‘डेडलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:06 AM2021-03-26T04:06:02+5:302021-03-26T04:06:02+5:30
औरंगाबाद : समृद्धी महामार्गावर पोखरी शिवारातील डोंगरात बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून १५ एप्रिलपर्यंत एका बाजूच्या बोगद्याचे काम पूर्ण ...
औरंगाबाद : समृद्धी महामार्गावर पोखरी शिवारातील डोंगरात बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून १५ एप्रिलपर्यंत एका बाजूच्या बोगद्याचे काम पूर्ण करून त्यातून १ मेपासून वाहतूक सुरू करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) प्रयत्न आहेत. सध्या डोंगराच्या दोन्ही बाजूंनी बोगद्याचे काम सुरू असून १३० मीटर लांबीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
या संदर्भात ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता बापूराव साळुंके यांनी सांगितले की, जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग असून, तीन तालुके व ७१ गावांतून तो गेला आहे. जिल्ह्यात या महामार्गावर एक बोगदा, ५ इंटरचेंजेस आणि १२५ अंडरपास तयार केले जात आहेत. डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर ते औरंगाबादपर्यंत या महामार्गाची पाहणी केली. तेव्हा १ मेपासून शिर्डीपर्यंत या महामार्गावरून वाहतूक सुरू करण्याचे आदेश ‘एमएसआरडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात या महामार्गाची कामे करणाऱ्या ‘मेगा इंजिनिअरिंग कंपनी व एल अँड टी या दोन कंत्राटदार संस्थांना १ मेपूर्वी ६ लेनपैकी एका बाजूच्या ३ लेनवरून वाहतूक सुरू करता येईल, या दिशेने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तत्पूर्वी, औरंगाबाद-सिल्लोड रस्त्यावरील सावंगी इंटरचेंजच्या पूर्वेचा पोखरी शिवारातील डोंगर कोरून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली होती, तर या इंटरचेंजच्या पश्चिम दिशेला डोंगर कापण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात या महामार्गावर २६० किलोमीटर लांबीचा हा बोगदा असून, नागपूरकडून येणाऱ्या दिशेने डोंगर कोरून आतापर्यंत जवळपास १३० मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावरून वाहनांना जाणे आणि येण्यासाठी या डोंगरात दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या ‘एमएसआरडीसी’च्या सूचना आहेत. उर्वरित दुसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
......... अपूर्ण ........