जेसीबीचा धक्का लागून जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाण्याची नासाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 06:35 PM2024-03-18T18:35:42+5:302024-03-18T18:37:31+5:30
पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील पिंपळवाडी फाट्यावरील घटना, रस्त्याला आले नदीचे स्वरूप
जायकवाडी: जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आज दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंपळवाडी फाट्यावर फुटली. यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. तसेच रस्त्यावरील दुकानात पाणी गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.
जायकवाडी धरणातून शेंद्रा एमआयडीसीला ९०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनने पाणीपुरवठा केला जातो. आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान येथे जेसीबीच्या सहाय्याने पाइपलाइन दुरूस्तीचे काम सुरू होते. यावेळी जेसीबीचा धक्का लागल्याने शेंद्रा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. लागलीच पाण्याचा उंच फवारा उडाला, लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. पाण्याचा फवारा आणि रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक एक तास खोळंबली होती.
दरम्यान, पाण्याच्या वेगवान फवाऱ्याने परिसरातील दुकानांवरील पत्रे उचकटले. तर काही दुकानांतील पत्र्यांना छिद्रे पडले. तसेच शटरच्या खालील भागातून पाणी आत शिरल्याने दुकानातील मालाचे व वस्तूंचे नुकसान झाले. एक तासानंतर जायकवाडी येथील पंप हाऊसमधील कर्मचाऱ्यांनी पाणी बंद केले.
पाच ते सहा दुकानांमध्ये शिरले पाणी...
पिंपळवाडी फाट्यावरील ओमप्रकाश बिश्नोई यांच्या मिठाई दुकानामध्ये पाणी शिरल्याने फ्रीज जळाले व मिठाई मालाचे नुकसान झाले. तसेच जावेद शेख यांच्या दुकानातील कॉम्प्युटर , प्रिंटर भिजून खराब झाले. जनता इलेक्ट्रिकल दुकानातील सिंमेट बॅग, प्लंबिग मटेरियल पाण्यात भिजून खराब झाले. तसेच प्रकाश जाट यांच्या भोलेनाथ आईस्क्रीममधील दोन फ्रीज जळाले. यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
- मुश्ताक शेख (व्यापारी)