जाफर गेट भागातील जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:24 AM2020-12-17T04:24:19+5:302020-12-17T04:24:19+5:30
औरंगाबाद : जाफरगेट येथे गुरुवारी रात्री ९ वाजता ५०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहागंज आणि जिन्सी येथील जलकुंभाकडे ...
औरंगाबाद : जाफरगेट येथे गुरुवारी रात्री ९ वाजता ५०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहागंज आणि जिन्सी येथील जलकुंभाकडे होणारा पाणीपुरवठा बंद झाला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने खोदकाम करून दुरुस्ती हाती घेतली. जलवाहिनीचा एक तुकडा पूर्णपणे बदलावा लागणार असल्यामुळे शनिवारीही काम सुरू राहणार आहे. परिणामी जुन्या शहरात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली.
जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कालबाह्य झाली आहे. अशा परिस्थितीतही पाणीपुरवठा विभागाला तारेवरची कसरत करीत पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागत आहे. वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत असल्याने पुन्हा सुरळीत होण्याच्या मार्गावर असलेला पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. गुरुवारी रात्री जाफरगेट भागात जलवाहिनी फुटली. एक तास पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. याची माहिती मिळताच प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी जाऊन पाणीपुरवठा बंद करून खोदकाम करून घेतले. मात्र, पूर्ण पाईप बदलावा लागणार असल्याने दुरुस्ती कामास विलंब होत आहे. शनिवारी सायंकाळी काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुना मोंढा, जिन्सी, शहागंज आदी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
------
पाच जणांवर गुन्हे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एसटी कॉलनी रोडवर पाच व्यक्तींनी शहागंज येथून हत्तेसिंगपुऱ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर जीआय लाइन टाकून अवैध कनेक्शन घेतले होते. याची मनपाला माहिती मिळताच किरण धांडे यांनी दुचाकीवर रात्री दहा वाजता तेथे भेट दिली. मनपाचे अधिकारी आल्याचे पाहून कनेक्शन घेणारे पसार झाले. मात्र, त्यानंतर रात्री दीड वाजेपर्यंत अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते. धांडे आणि मोरे तेथे तोपर्यंत ठाण मांडून होते. या कनेक्शनमुळे शहागंज व परिसराला पाणीपुरवठाच होऊ शकला नसता. तसेच सात दिवसांवरून पाच दिवसांआड आलेला पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला असता, असेही धांडे यांनी सांगितले.