ठेकेदारांच्या मनमानीने दोन महिन्यांत पाच मृत्यू; पोलिसांच्या ‘एनओसी’ शिवायच कामे सुरू
By सुमित डोळे | Published: October 8, 2024 12:13 PM2024-10-08T12:13:29+5:302024-10-08T12:14:36+5:30
भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते.
छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या शासकीय कामांच्या ठेकेदारांकडून निष्काळजीपणा केला जात आहे. वारंवार बजावून एकाही कामाची एनओसी वाहतूक पोलिसांकडून घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. भर रस्त्यात कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवून आवश्यक उपाययोजना करत नसल्याचे दिसते. परिणामी, गेल्या दोन महिन्यांत पाच नागरिकांचे जीव गेले. विशेष म्हणजे, मनपाने दिलेल्या कंत्राटदार कंपनीमुळे म़ृत्यूची ही दुसरी घटना आहे.
उलट बाजूने सुसाट जाणाऱ्या स्काॅर्पिओच्या (एमएच ०६ -एएन- ८०७६) धडकेत ६ ऑक्टोबरला मध्यरात्री १ वाजता हेमंत पाखरे (रा. पदमपुरा), राहुल लोदी (रा. केशरसिंगपुरा) या दोन मित्रांचा मृत्यू झाला. सातारा पोलिस ठाण्यात पसार स्कॉर्पिओचालक व जलवाहिनीच्या काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानुभाव चौकाकडून रेल्वेस्थानक रस्त्यावर जीव्हीपीआर कंपनीकडून जलवाहिनीचे काम सुरू आहे. कंपनीने मात्र कुठल्याच स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिसांना याबाबत कुठलीच कल्पना दिली नाही. दिशादर्शक फलक न लावता एक रस्ता बंद करून वाहतूक रॉंग साइडने वळवली. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना किंवा सुरक्षारक्षक तैनात केला नाही.
ठेकेदारांचा मनमानी कारभार
जीव्हीपीआर कंपनीकडून शहरात ठिकठिकाणी जलवाहिनीचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे पाइप संपूर्ण शहरातील मुख्य चौक, रस्त्यांवर धोकेदायकरित्या थर रचून ठेवण्यात आले आहे. अन्य रस्त्यांच्या कामात देखील बेजबाबदारपणे खड्डे खोदून, तसेच सोडले जातात.
यापूर्वी ठेकेदारामुळे मृत्यू
- जगन्नाथ कुलकर्णी (रा. नारेगाव) यांचा मुकुंदवाडी एसटी वर्कशॉप ते फॅक्सोप्लास कंपनी रस्त्यावर ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाला.
- सिडको चाैकात जलवाहिनीच्या खड्ड्यात पडून राजू गायकवाड, या तरुणाचा मृत्यू झाला.
- माळीवाडा पुलावर मातीऱ्या ढिगाऱ्याला धडकून आशिष सपकाळ (रा. पहाडसिंगपुरा) या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात दौलताबाद ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा.
वारंवार समज पण...
रस्त्यांवरील कुठल्याही कामासाठी वाहतूक पोलिसांना पूर्वकल्पना देऊन एनओसी घेणे बंधनकारक आहे. त्यात वाहतूक पोलिस ठेकेदारांना कामासाठी वेळ ठरवून देतात शिवाय सूचनाफलक, सुरक्षारक्षक, बॅरिगेड्स बंधनकारक करतात. मात्र, शहरातील एकाही शासकीय कामाबाबत ठेकेदारांनी पोलिसांकडून परवानगी घेतलेली नाही. पोलिसांना न सांगताच सर्रास रस्त्यावर कुठल्याही वेळेत काम करणे, साहित्य ठेवले जातात.
कठोर भूमिका घेणार
रस्त्यावरील कामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्यक असते. आम्ही त्यानंतर आवश्यक अटी शर्थींसह परवानगी देतो, परंतु ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर कठोर भूमिका घेतली जाईल.
- धनंजय पाटील, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग.