केंद्रीय कार्यालयातील अधिकारी भ्रष्ट आहेत? मग थेट सीबीआयकडे तक्रार द्या, असा करा संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 07:13 PM2024-09-28T19:13:21+5:302024-09-28T19:14:04+5:30

उद्योजक, व्यापाऱ्यांना चक्क ‘सीबीआय’चे बैठक घेऊन आवाहन

Are Central Office officials corrupt? Then file a complaint directly with CBI | केंद्रीय कार्यालयातील अधिकारी भ्रष्ट आहेत? मग थेट सीबीआयकडे तक्रार द्या, असा करा संपर्क

केंद्रीय कार्यालयातील अधिकारी भ्रष्ट आहेत? मग थेट सीबीआयकडे तक्रार द्या, असा करा संपर्क

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी कार्यालये, राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात तुमचे काम होत नाही, सर्व कागदपत्रे असूनही जाणून बुजून फाइल दाबली जाते, केंद्र सरकारच्या योजनांमधील लाभार्थींकडून चिरीमिरीची मागणी होते, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)च्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखा (एसीबी) पुणेकडे ऑनलाइनवर लेखी तक्रार करा किंवा मोबाइलवर माहिती द्या, असे आवाहन केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) एसबी विभागाच्या पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप यांनी शुक्रवारी येथे केले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच सीबीआयच्या वतीने शहरात उद्योजक व व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. बैठकीत शहरातील उद्योजक, व्यावसायिकांच्या ३३ संघटना मिळून बनविलेल्या ‘टीम ऑफ असोसिएशन’च्या वतीने सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. ‘सीबीआय’बद्दल सर्वांमध्ये अनेक गैरसमज, भीती आहे. ते दूर करण्यासाठी या जनसंवाद बैठकीचे आयोजन केल्याची माहिती जगताप यांनी दिली. सीबीआयमधील एसीबी विभाग केंद्र सरकार, राष्ट्रीयकृत बँक, आयकर विभाग, केंद्रीय जीएसटी, पोस्ट खाते, सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी जर काम करण्यासाठी लाच मागत असल्यास किंवा पदाचा गैरवापर करीत असल्यास थेट सीबीआयच्या मोबाइल नंबर, दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. घर बसल्या ई-मेल करून तक्रार द्या. त्या तक्रारीत काही तथ्य आहे का याची तपासणी करून खात्री झाल्यावर संबंधितावर चौकशी व गुन्हा दाखल केले जाईल, असे आश्वासन यावेळी जगताप यांनी दिले.

उद्योजक, व्यापाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिले. यावेळी ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष गिरिधर संघेनेरिया, प्रफुल्ल मालाणी, आदेशपालसिंग छाबडा, शिवशंकर स्वामी, सरदार हरिसिंग, जयंत देवळाणकर यांच्यासह सर्व व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी हजर होते.

‘सीबीआय’ नावामुळे सर्वच घाबरले
उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘सीबीआय’ ने बैठकीला बोलविले म्हटल्यावर आधी भीती वाटली होती. पण आजच्या बैठकीने भीती दूर झाली. केंद्रीय कार्यालयातील भ्रष्टाचारी अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार कुठे करावी माहिती नव्हते. बैठकीतून सर्व स्पष्ट झाले.

तक्रार कुठे करणार
केंद्र शासनाच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी पदाचा गैरवापर करीत आहे किंवा लाच मागत असल्यास त्याची तक्रार सीबीआयच्या एसीबी विभागाकडे ९१७५०२२२५० या मोबाइल नंबरवर किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२७६४२५०२/ २७६४२५०४ यानंबरवर संपर्क साधावा व लेखी तक्रार ईमेल-
hobacpune@cbi.gov.in येथे दाखल करावी.

Web Title: Are Central Office officials corrupt? Then file a complaint directly with CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.