आजारी आहात... टेन्शन कसले घेताय, आता १ मेपासून येतोय ‘आपला दवाखाना’
By विजय सरवदे | Published: April 28, 2023 08:26 AM2023-04-28T08:26:00+5:302023-04-28T08:30:02+5:30
सर्वांसाठी मोफत उपचार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १४ दवाखाने
छत्रपती संभाजीनगर : आजारी आहात... काळजी करू नका. आता १ मेपासून महापालिका आणि सर्व तालुक्यांच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू होत असून, तिथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या चाचण्यांची सेवा मोफत मिळणार आहे. त्यामुळे घाटी हॉस्पिटल किंवा सरकारी रुग्णालयांच्या रांगेत तासन्तास उभे राहण्याची चिंता सोडा.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यात ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात असे ७०० दवाखाने सुरू करण्यात येणार असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९ दवाखाने असतील. शहरातील झोपडपट्टी परिसर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना छोट्या- छोट्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. त्यामुळे अनेकदा उपचाराला उशीर होतो, शिवाय प्रवासाचा खर्च होतो. राहण्याची गैरसोयसुद्धा होते. दुसरीकडे दैनंदिन रुग्णांमुळे घाटीसारख्या सरकारी हॉस्पिटलवर ताण वाढतो. ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभाग, अशा तात्काळ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांवर होतो. हे टाळण्यासाठी ‘आपला दवाखाना’ सुरू केला जात आहे.
कोठे असतील हे दवाखाने
‘आपला दवाखाना’ ही योजना जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी १५, महापालिका क्षेत्रात १२ आणि छावणी परिसरात २, अशा एकूण २९ ठिकाणी राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ मेपासून १४ दवाखाने यात महापालिका क्षेत्रात ५ आणि ग्रामीण भागात ८ दवाखाने सुरू केेले जाणार आहेत.
कोणकोणत्या सुविधा मिळणार
या दवाखान्यांमध्ये बाह्यरुग्ण विभाग असणार आहे. येथे दररोज रुग्ण तपासणी केली जाणार आहे, तसेच असांसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण, माता बाल संगोपन कार्यक्रमात येणाऱ्या रोगांवर उपचार केले जातील. रक्त, लघवी यांसारख्या तपासण्याही येथे केल्या जातील.
वैद्यकीय मनुष्यबळ
या दवाखान्यांत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका असतील. यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पायाभूत सुविधा, औषधांवर खर्च केला जाणार आहे, तर मनुष्यबळाचे वेतन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा निधीतून केले जाणार आहे. यासाठी उद्या २८ एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य विभाग १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुलाखतीद्वारे भरती करणार आहे.
दवाखान्यासाठी जागा
तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका, नगरपंचायतींकडे उपलब्ध इमारतीमध्ये हे दवाखाने सुरू केले जाणार आहेत, तर जिथे इमारत उपलब्ध नाही, तिथे किरायाच्या इमारतीत दवाखाने सुरू केले जाणार आहेत. तालुके व छावणी भागात या दवाखान्यांवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे, तर मनपा क्षेत्रात महापालिका आयुक्तांचे नियंत्रण असेल.