पोलीस अधिकाऱ्याशी अरेरावी महागात पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:07 AM2021-01-03T04:07:05+5:302021-01-03T04:07:05+5:30
औरंगाबाद : लुटमारीच्या फिर्यादीत एका तरुणाला चौकशीसाठी बोलवल्याने राजकारणात सक्रिय असलेल्या एका भाईने पोलीस अधिकाऱ्याला अरेरावी केल्याने या भाईला ...
औरंगाबाद : लुटमारीच्या फिर्यादीत एका तरुणाला चौकशीसाठी बोलवल्याने राजकारणात सक्रिय असलेल्या एका भाईने पोलीस अधिकाऱ्याला अरेरावी केल्याने या भाईला पोलिसांनी नववर्षाचा प्रसाद दिला. या घटनेची राजकीय वर्तुळासह पोलीस दलातही खमंग चर्चा सुरू आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सातारा पोलीस ठाण्यात एका तरुणाने आपल्याला लुटमार करण्यात आल्याची तक्रार दिली होती. तक्रार देणाऱ्या तरुणाला जबाब नोंदविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलविले होते. तेव्हा त्याने लुटमारीच्या तक्रारीत केलेले काही आरोप हे चुकीचे असल्याचे समोर आले. त्यामुळे तरुणाला अधिकाऱ्याने फैलावर घेतल्याचे कळते. यानंतर तरुणाने त्याच्या राजकारणी भावाला माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर भाईने पाच- दहा कार्यकर्त्यांसह पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांचे दालन गाठून गोंधळ घालायचा प्रयत्न करीत अरेरावी केली. अधिकाऱ्याने यावरून त्याला चांगलाच ‘प्रसाद’ देत खुमखुमी उतरविल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. यापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीदेखील याच भाईला असाच प्रसाद दिला होता. तेव्हापासून भाई शांत होते. मात्र, पुन्हा भाईने पूर्वीची स्टाईल वापरून अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी पोलिसी खाक्या दाखविल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे, तर असे काही घडलेच नसल्याचे भाईने सांगितले.