घृष्णेश्वर मंदिरात नियोजनाचा फज्जा उडाला; दर्शनरांगेत भाविकांत वाद होऊन हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:00 IST2025-02-26T14:57:36+5:302025-02-26T15:00:22+5:30
भाविकांच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

घृष्णेश्वर मंदिरात नियोजनाचा फज्जा उडाला; दर्शनरांगेत भाविकांत वाद होऊन हाणामारी
- सुनील घोडके
खुलताबाद: बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने सकाळी ८:३० वाजता मुख्यगेट जवळ तीन भाविकांत तु- तु मै- मै होऊन थेट हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली असून हा नेमका प्रकार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दर्शन दौ-यात झाल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून थेट ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांना फोनवरून सुनावले आहेत.
सकाळी ८:३० विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सहकुटुंब वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हा गेटवरच तीन भाविकांत रांगेत मागेपुढे जाण्यावरून हाणामारी सुरू झाली. तिघांनी एकमेकांना चापटबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान, श्री घृष्णेश्वर मंदीर देवस्थान कार्यालयात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांना फोन लावला. महाशिवरात्रीला मोठी गर्दी असतांना या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी तसेच महसूलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहायला हवे होते. परंतु, वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने असले प्रकार होत असल्याची नाराजी व्यक्त केली, त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंदीर देवस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली. दरम्यान हाणामारीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने प्रशासनाचा नियोजनशुन्य कारभार चव्हाट्यावर आला आहे.