अर्जुन, भक्ती पिवळ्या वाघाची जोडी पुण्याला जाणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:23 PM2021-07-31T18:23:44+5:302021-07-31T18:24:52+5:30
पुणे येथील राजीव गांधी झुऑलॉजिकल पार्क ॲन्ड वाईल्ड लाईफ रिसर्च सेंटरने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पिवळ्या वाघाच्या जोडीची मागणी केली होती.
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. वाघांचा सांभाळ करण्यासाठी महापालिकेकडे पुरेशी जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालयामधील पिवळ्या वाघाची एक जोडी पुणे येथील राजीव गांधी झुऑलॉजिकल पार्क ॲन्ड वाईल्ड लाईफ रिसर्च सेंटरला देण्यात येणार आहे. या मोबदल्यात दोन नीलगायी दिल्या जाणार आहेत. प्राणिसंग्रहालयांतर्गत केल्या जाणाऱ्या या ‘एक्सचेंज’ला केंद्र शासनाच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
पुणे येथील राजीव गांधी झुऑलॉजिकल पार्क ॲन्ड वाईल्ड लाईफ रिसर्च सेंटरने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पिवळ्या वाघाच्या जोडीची मागणी केली होती. प्राधिकरणाने या संदर्भात औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाकडे विचारणा केली. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात ११ पिवळे वाघ आहेत. त्यामुळे त्यातील दोन वाघ राजीव गांधी झुऑलॉजिकल पार्कसाठी देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या बद्दलची फाईल केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत होती.
या मंत्रालयाने फाईलला नुकतीच मंजुरी दिली आहे. तसे पत्रदेखील वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून राजीव गांधी झुऑलॉजिकल पार्कच्या संचालकांना प्राप्त झाले. या पत्राची प्रत औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाला देण्यात आली. वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील अर्जुन हा ७ वर्षाचा वाघ आणि भक्ती ही ५ वर्षाची वाघीण आता पुण्याला पाठवली जाणार आहे. या मोबदल्यात औरंगाबादला पुण्याहून दोन नीलगायी दिल्या जाणार आहेत. येत्या एक -दोन महिन्यांत वाघाची जोडी पुण्याला पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.