'अर्जुन बाण' भात्यात; खोतकरांकडे 'अम्पायर'ची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 09:04 PM2019-03-13T21:04:07+5:302019-03-13T21:06:04+5:30

अर्जुन खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय धुडकवून बच्चू कडू यांच्याशी हातमिळवणी केल्यास जालना लोकसभा निवडणूक अधिकच रंगतदार होईल, यात शंका नाही.

Arjun Khotkar appointed as coordinator for Marathwada for Lok sabha Election 2019 | 'अर्जुन बाण' भात्यात; खोतकरांकडे 'अम्पायर'ची जबाबदारी

'अर्जुन बाण' भात्यात; खोतकरांकडे 'अम्पायर'ची जबाबदारी

googlenewsNext

औरंगाबाद - राज्यात आघाडीच्या राजकीय पक्षांच्या पदरात काही ना काही टाकणाऱ्या जालना जिल्ह्याचे राजकारण लोकसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच चर्चेत आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जालन्याच्या राजकारणात कोणत्या ना कोणत्या मार्गाने सत्तेत असलेले शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आमने-सामने उभे ठाकले होते. परंतु या संघर्षाच्या स्थितीत शिवसेना नेतृत्वाने अर्जुन खोतकर यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची जबाबदारी सोपवून एकप्रकारे फॉर्मात असलेल्या खेळाडूला पंच म्हणून नियुक्त केले. त्यामुळे दानवे-खोतकर संघर्ष मावळल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खोतकर आणि दानवे यांचं वैर सर्वांनाच ठावूक आहे. परंतु राज्यात मोठा भाऊ ठरलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे रावसाहेब दानवे मागील पाच वर्षात राज्य पातळीवर पॉवरफुल झाले आहेत. याउलट खोतकर यांना जालना विधानसभा जिंकण्यासाठी करावा लागलेला संघर्ष सर्वश्रूतच आहे. अशा परिस्थितीत देखील खोतकर यांनी दानवे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. परंतु निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला होता. अखेरीस खोतकर यांच्या वाट्याला अम्पायरची अर्थात समन्वयकाची जबाबदारी आली. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना पक्षांनी ताळमेळ व्यवस्थीत असावा यासाठी राज्यातील विविध विभागांसाठी समन्वयकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या समन्वयकपदी अर्जुन खोतकर आणि भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे भवितव्यासंदर्भातील निर्णय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणारे अर्जुन खोतकर यांचा बाण पुन्हा भात्यात, अशी काहीशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. किंबहुना उद्धव यांनी खोतकर यांच्या संदर्भात हाच निर्णय दिला, अशी शक्यता आहे.

खोतकर-बच्चू कडू येणार सोबत ?
गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या तुरीवरून वादग्रस्त वक्तव्य करणारे रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी अपक्ष आमदार बच्चू कडू आक्रमक आहेत. त्यात दानवेविरोधात अर्जुन खोतकर यांनी सूर काढल्याने दानवे यांच्यासाठी यंदाची निवडणूक खडतर ठरेल असा अंदाज होता. बच्चू कडू यांनी देखील दानवे यांना पाडण्यासाठी खोतकर यांच्याशी हात मिळवणी करू, असे म्हटले होते. परंतु खोतकरच मागे फिरल्याने दानवे यांचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय धुडकवून बच्चू कडू यांच्याशी हातमिळवणी केल्यास जालना लोकसभा निवडणूक अधिकच रंगतदार होईल, यात शंका नाही.

Web Title: Arjun Khotkar appointed as coordinator for Marathwada for Lok sabha Election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.