‘अर्जुना’ने शोधला ‘संकटकालीन’ मार्ग! लवकरच शिंदे गटात जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 06:44 AM2022-07-27T06:44:18+5:302022-07-27T06:46:57+5:30
दानवे यांच्याशी केला समेट; लवकरच शिंदे गटात जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपल्यावरील ‘ईडी’चे संकट टाळण्यासाठी नवा मार्ग शोधला असून, राजकीय प्रतिस्पर्धी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी दिलजमाई केली आहे. खोतकर लवकरच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे समजते.
जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले खोतकर यांच्यामागे रामनगर साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीसंदर्भात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदीप्रकरणी खोतकर यांच्यावर १०० कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर ईडीच्या पथकाने खोतकर यांची चौकशी केली होती. मात्र, चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याने ईडीने बाजार समितीवर छापा टाकून कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच रामनगर साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली.
खोतकर हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत शिंदे यांनी दानवे-खोतकर यांच्यात समेट घडवून आणल्याचे समजते. त्यानंतरही खोतकरांनी पत्ते उघड केले नव्हते.
काय आहे नेमके प्रकरण?
जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखाना कर्जबाजारी झाल्याने कारखान्याचा लिलाव करण्यात आला. खोतकर यांच्या मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीने तो ४२ कोटी ३१ लाख रुपयांत खरेदी केला. मात्र, त्यानंतर ईडीने स्वतंत्रपणे या मालमत्तेचे सर्वेक्षण केल्यानंतर या कारखान्याच्या मालमत्तेची एकूण किंमत ७८ कोटींपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली.
संकटाच्या काळात कुणीही स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करतो. कुटुंबाचे आणि बाकीचे अनेक तणाव असतात. पुढील निर्णय लवकरच सांगेन.
- अर्जुन खोतकर
दानवेंच्या घरी चहापान : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी सकाळी खोतकर यांना दिल्ली येथील निवासस्थानी चहापानासाठी निमंत्रित केले होते. या भेटीत उभयतांमध्ये दिलजमाई घडून आल्याचे समजते.