वाळूज उद्योनगरीत शस्त्रास्त्रासह दोघेजण जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:17 PM2019-04-02T23:17:46+5:302019-04-02T23:17:53+5:30
वाळूज उद्योनगरीत घातक शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण करुन लुटमार करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री बजाजनगरात जेरबंद केले.
वाळूज महानगर : वाळूज उद्योनगरीत घातक शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण करुन लुटमार करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री बजाजनगरात जेरबंद केले. या दोघांच्या ताब्यातून एक एअरगन, धारदार तलवार व स्कुटी जप्त करण्यात आली आहे.
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे डीबी पथक सोमवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, बजाजनगरातील मोहटादेवी चौकात दोन संशयित तरुण तलवार घेऊन स्कुटीवर फिरत असल्याची माहिती खबऱ्याने फौजदार राहुल रोडे याना दिली. त्यानंतर गस्तीवरील पथकाने मोहटादेवी चौकात संशियतांना पकडण्यासाठी सापळा रचला. काही वेळानंतर संशयित तरुण काळ्या रंगाच्या स्कुटीवर बजाजनगरातून सिडको वाळूजमहानगरातील उद्यानाकडे जाताना दिसून आले. पथकाने स्कुटीस्वारास थांबण्याचा इशारा केला असता त्यांना पाठीमागे बसलेल्या तरुणाकडे धारदार तलवार दिसली.
पथकाने चोहोबाजुने नाकाबंदी करुन दोघांना रात्री १२ वाजेच्या सुमारास शिताफीने जेरबंद केले. या दोघांची कसून चौकशी केली असता राहुल अशोक धोत्रे (२२ रा. जयभवानी चौक, बजाजनगर) तर सनी राजु कुल्ते (१८ रा. बेगमपुरा) अशी त्यांची नावे सांगितली. राहुल धोत्रेकडून तीन फुट लांबीची धारदार तलवार तर सनी कुल्तेच्या ताब्यातून एअरगन जप्त करण्यात आली. तसेच स्कुटीही (एम.एच.२०, एफ.बी.१५३१) जप्त करण्यात आली.
दोघेही सराईत गुन्हेगार
राहुल धोत्रे व सनी कुल्ते हे दोघे सराईत गुन्हेगार आहे. वाळूज औद्योगिक परिसरात रात्रीच्या धारदार शस्त्राचा धाक दाखवून कामगार व व्यवसायिकांना लुटत असल्याची कबुली दोघांनी पोलिसांना दिली. बजाजनगरात १२ मार्चला दोघांनी गजानन सोनवणे (२८) या वडापाव विक्रेत्यास मारहाण केली होती. तसेच त्याची हातगाडी पलटी केल्यामुळे उकळते तेल अंगावर पडुन सोनवणे भाजला होता.