बंद कंपनीच्या मालकीहक्कातून सशस्त्र हल्ला; सुरक्षारक्षक ठार, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 05:24 PM2019-05-02T17:24:47+5:302019-05-02T17:26:27+5:30
हल्लेखोरांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
औरंगाबाद: शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील चार वर्षापासून बंद पडलेल्या कंपनीच्या मालकीहक्कावरून दोन गटात १ मे रोजी रात्री जोरदार सशस्त्र हाणामारी झाली. याघटनेत कंपनीचा सुरक्षारक्षकावर तलवार, चाकूने हल्ला करण्यात आल्याने तो ठार झाला, तर सुरक्षारक्षक भावाला वाचविण्यासाठी धावलेल्या त्याचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. शिवाय हल्लेखोरांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात खून आणि खूनाचा प्रयत्न केल्याची वेगवेगळी गुन्हे नोंदविली.
रिजवान खान रशिद खान (वय ३६,रा. टाऊन हॉल परिसर) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तर रिझवानचा लहान भाऊ मेहराज खान रशिद खान आणि हल्लेखोर खालेद अबु तुराब (वय ४०,रा. रोशनगेट)आदिलखान नसीर खान (वय २५,रा. कटकटगेट), आवेश खान दोस्त मोहम्मद खान (वय २०,रा. टाऊन हॉल) हे जखमी झाले आहेत. अन्य आरोपी कैसर कुरेशी आणि माजीद हे किरकोळ जखमी झाले.
याविषयी अधिक माहिती देताना चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, शेंद्रा एमआयडीसीमधील नूर इंटरप्रायजेस ही कंपनी बीफची चार ते पाच वर्षापासून बंद आहे. या कंपनीच्या मालकीहक्कावरून अब्दुल गणी कुरेशी , साजीद कुरेशी आणि खालेद अबु तुराब यांच्यात वाद सुरू आहे. सध्या ही कंपनी गणी कुरेशी यांच्या ताब्यात आहे. रिजवान हा नऊ वर्षापासून कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. तर मेहराज खान हा पाच वर्षापासून भावासोबत याच कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. रिजवान हे कंपनीतच राहत होता तर त्यांचा मेहराज हे रिजवान यांना जेवणाचा डबा पुरवित.
१ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रिजवान आणि मेहराज हे दोघे भाऊ कंपनीच्या गेटवर बसलेले होते. यावेळी आरोपी खालेद , आदिल खान, आवेश खान, कैसर कुरेशी आणि माजीद हे एका वाहनातून कंपनीत आले असता रिजवान यांनी त्यांना कंपनीच्या बाहेर चला असे सांगितले. तुमचे जे काही म्हणणे आहे ते कंपनीमालकासोबत बोला, असे म्हणाला. यावेळी आरोपींनी रिजवानला शिवीगाळ करण्यास सुरवात केली आणि खालेदने अचानक रिजवानच्या पोटात चाकू खुपसला. रिजवानला वाचविण्यासाठी धावलेल्या मेहराजवर आरोपी कैसर कुरेशीने चाकूहल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. याघटनेत रिजवान घटनास्थळीच ठार झाला. याघटनेनंतर आरोपी कंपनीतून पळून गेले.